नाशिक: गंगापूर तुडूंब होण्याच्या मार्गावर, जायकवाडीला पाणी सोडावे लागण्याची चिन्हे

पुढील काळात पावसाची हुलकावणी कायम राहिल्यास केवळ गंगापूरच नव्हे तर, वरील भागातील अन्य धरणांमधून जायकवाडीला पाणी द्यावे लागणार आहे.

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४८९५ दशलक्ष घनफूट म्हणजे ८७ टक्के जलसाठा झाल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला असला तरी जायकवाडीत ३३.१८ टक्के जलसाठा असल्याने समन्यायी पाणी वाटप तत्वामुळे हंगाम संपुष्टात आल्यानंतर गंगापूरमधून पाणी सोडावे लागते की काय, अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. पुढील काळात पावसाची हुलकावणी कायम राहिल्यास केवळ गंगापूरच नव्हे तर, वरील भागातील अन्य धरणांमधून जायकवाडीला पाणी द्यावे लागणार आहे.

यावर्षी घाटमाथा परिसर वगळता इतरत्र दमदार पाऊस झालेला नाही. रिमझिम स्वरुपात तो हजेरी लावत आहे. या स्थितीमुळे जुलैत तुडूंब होणारी धरणे यंदा ऑगस्टच्या पूर्वार्धातही भरू शकली नाहीत. मध्यंतरी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमधील पावसाने ज्या धरणांचे पाणलोट क्षेत्र या तालुक्यात आहे, तेथील धरणांचा जलसाठा काहिसा उंचावला. त्यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पातळी ८७ टक्क्यांवर पोहोचली. हंगामाला अडीच महिने होण्याच्या मार्गावर असताना आजतागायत गोदावरीतून एकही पूर गेलेला नाही. गंगापूर धरण तुडूंब होण्याच्या स्थितीत आल्यामुळे शहराची पाण्याची चिंता मिटणार आहे. तथापि, अपुऱ्या पावसाने वरील भागातील धरणांमधून पाणी सोडण्याचे नवीन संकट उभे ठाकणार आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”

समन्यायी तत्वावर वाटप अन् सद्यस्थिती

गोदावरी खोऱ्यातील पावसाच्या पाण्याचे समन्यायी तत्वावर वाटप केले जाते. या संबंधीचे धोरण निश्चित आहे. सध्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ३३.१८ टक्के जलसाठा आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत त्या धरणात ६५ टक्के जलसाठा झाला नसल्यास वरील भागातील म्हणजे नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागते. यापूर्वी दुष्काळी वर्षात पाणी सोडावे लागले आहे. सध्याचा विचार करता जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ६४.९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सात ऑगस्टपर्यंत साधारणत: ५४३.६ मिलीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत ३५२.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ७१३.४ मिलीमीटर (१३१ टक्के) होते. गंगापूरसह जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागेल की नाही हे सर्वस्वी पुढील काळातील पावसावर अवलंबून आहे. हंगामातील एकंदर स्थिती पाहता समन्यायी तत्वाच्या निकषाच्या आधारे नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी द्यावे लागू शकते. हंगाम संपल्यानंतर वरील व खालील भागातील धरणातील जलसाठ्याच्या आधारे याची स्पष्टता होईल.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

किती पाणी सोडावे लागू शकते ?

गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी धरणात (खालील भागातील) हंगाम संपुष्टात येताना ६५ टक्क्यांहून अधिक जलसाठा असल्यास वरील भागातील म्हणजे नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागत नाही. हा जलसाठा त्यापेक्षा कमी असल्यास समन्यायी तत्वाने वरील धरणांमधून पाणी सोडावे लागते. यंदा काहिशी तशीच स्थिती आहे. सध्या जायकवाडी धरणात ३३.१८ टक्के जलसाठा आहे. पुढील काळात या अवाढव्य धरणात कितपत जलसाठा होईल, हा प्रश्न आहे. दरवर्षी नाशिक व नगर जिल्ह्यातील पूरपाणी जायकवाडीच्या जलसाठ्यात लक्षणीय भर घालते. यंदा धरणांमधून फारसा विसर्ग झाला नाही. पूरपाणी गेले नाही. त्यामुळे पाणी वाटप धोरण क्रमांक दोनचा अवलंब होऊ शकतो. त्यानुसार जायकवाडीत ५४ टक्के जलसाठा असल्यास गंगापूरमध्ये ७४ टक्के जलसाठा ठेवता येईल. म्हणजे या धरणातून उर्वरित पाणी जायकवाडीला सोडावे लागेल. धोरण क्रमांक तीननुसार जायकवाडीचा जलसाठा ६५ टक्क्यांपर्यंत गेला तर गंगापूरमध्ये ८८ टक्के जलसाठा राखता येईल. उर्वरित पाणी सोडावे लागेल. हंगामाच्या अखेरीस जायकवाडीत किती जलसाठा होतो, यावर वरील धरणांमध्ये किती जलसाठा राहील याचे समीकरण निश्चित होईल.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप