नाशिक : गुटख्यासाठी सुरगाण्यातील जंगलातून खैराची तस्करी

खैराच्या झाडापासून गुटख्यासाठी लागणारा कात आणि रसायन बुकटी बनविण्यात येत असल्याने त्याला चांगली मागणी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड करून तस्करी केली जात आहे.

गुटखा तयार करण्यासाठी दुर्मिळ अशा खैराची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाण्यात उघडकीस आला आहे. जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडाची तोड होत असताना वन विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या सुरगाणा या आदिवासी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वन संपदा आहे. अनेक दुर्मिळ झाडे या ठिकाणी आढळतात. त्यापैकी खैर हे एक होय. कुकडणे आणि गुजरात सीमेलगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात खैराची झाडे आहेत. खैराचे अनेक उपयोग आहेत. खैराच्या झाडापासून गुटख्यासाठी लागणारा कात आणि रसायन बुकटी बनविण्यात येत असल्याने त्याला चांगली मागणी आहे. नेमके हे हेरून तस्करांनी खैराच्या झाडाकडे आपला मोर्चा वळवला असून रात्रीच्या वेळी जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड करून तस्करी केली जात आहे. खैराचे झाड कापून झाले की खोड जाळून पुरावा नष्ट केला जात आहे. विशेष म्हणजे वन विभागाचे सुरक्षारक्षक, कर्मचारी आणि तपासणी केंद्र असतांना ही लाकडे बाहेर जातात कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वन विभागाच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

हे वाचले का?  फिरत्या पथकाची आता खाणींवर नजर, वन विभागाच्या आश्वासनानंतर ब्रम्हगिरी कृती समितीचे आंदोलन स्थगित

खैराचे लाकूड ४० रुपये किलो

गुटखा बनविण्यासाठी उपयोग होत असल्याने खैराच्या लाकडाला किलोला ३८ ते ४० रुपये भाव मिळतो. एका झाडापासून दोन ते तीन टन लाकूड मिळते. त्यामुळेच खैराच्या झाडांची तोड होत आहे. स्थानिकांनी याबाबत वनविभागाला कळविले, परंतु, त्यांच्याकडून कुठलीही दखल घेण्यात येत नसल्याने वन विभागाच्या आशीर्वादानेच खैराच्या तस्करीचा प्रकार सुरु असल्याचा संशय येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. आता तरी वनविभागाने जागे होऊन उर्वरित खैराची झाडे वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

हे वाचले का?  नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड, पैसे वाटपाची तक्रार

वन विभागाकडून तस्करी रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. चोर पोलिसांसारखा खेळ सुरू राहतो. वन विभागाकडून वाहनांची तपासणी, नाक्यावर तपासणी केली जाते. या माध्यमातून तस्करीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत वनातून तस्करी होणारे लाकडू जप्त करण्यात आले, अशी माहिती कैलास उंबरठाणचे वनअधिकारी नागरगोजे यांनी दिली