नाशिक : जिंदाल कंपनीतील आग २४ तासानंतर नियंत्रणात; दुर्घटनेच्या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची समिती

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे सुमारे २५० एकरात जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीचा पसारा आहे

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रविवारी लागलेली आग तब्बल २४ तासानंतर नियंत्रणात आली आहे. या दुर्घटनेची चौकशी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या समितीद्वारे केली जाणार आहे. या समितीत तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे सुमारे २५० एकरात जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीचा पसारा आहे. रविवारी सकाळी कंपनीत आग लागली. या दुर्घटनेत दोन महिला कामगारांचा भाजून मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर, पण स्थिर आहे. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी तर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील समितीमार्फत या घटनेची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी घेतला आहे.

हे वाचले का?  Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

संपर्क क्रमांक कार्यान्वित

जिंदाल कंपनीतील दुर्घटनेदरम्यान कंपनीत उपस्थित परंतु, अद्यापही संपर्क होऊ न शकलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी संबंधित बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या तपशिलासह इगतपुरी तहसील कार्यालयात ०२५५३-२४४०००९ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांकही जाहीर करण्यात आले असून त्यात इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण (८१०८८५१२१२), इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे (९६०४०७५५३५), निवासी नायब तहसीलदार प्रविण गोंडाळे (९८५०४४०७६०), महसूल सहायक नितिन केंगले (९७६७९००७६९) यांचा समावेश आहे.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज