१९ लाख ५८ हजार ५४० रुपये संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नाशिक : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील जागा विक्री व्यवहारात प्राप्त झालेल्या रकमेपैकी सुमारे २० लाख रुपयांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्या प्रकरणी संघाचे संचालक व सनदी लेखापाल अशा एकूण १० जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष वाघचौरे यांनी तक्रार दिली. नाशिक जिल्हा सहकारी दूध संघाच्या वडाळा नाका येथील कार्यालयात ऑगस्ट २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संघाची माळेगाव औद्योगिक वसाहतीत जागा होती. ही जागा विक्री करताना संशयितांनी विहित प्रक्रियेचे पालन केले नाही. जागा व्यवहाराबाबत जाहिरात देऊन स्पर्धात्मक किंमत मिळवता आली असती. परंतु, जाहिरात न देता हा व्यवहार करण्यात आला. स्पर्धात्मक किंमत न मिळाल्याने या व्यवहारात संघाचे नुकसान झाले. शिवाय, या व्यवहारापोटी ४९ लाख ७६ हजार ४५१ रुपये प्राप्त झाले होते. यातील १९ लाख ५८ हजार ५४० रुपये संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी हौशीराम घोटेकर, संचालक विनोद चव्हाण, विजय कोतवाल, दिलीप शेवाळे, नामदेव, भाऊराव पाटील, छाया काळे, कल्पना कुऱ्हे, वसंत सोनवणे या कार्यकारी संचालकांसह सनदी लेखापाल जयेश देसले या १० जणांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. गेंगजे हे तपास करत आहेत.