डिसेंबरच्या मध्यावर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांत ४८ हजार ७६७ दशलक्ष घनफूट अर्थात ७४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
नाशिक – डिसेंबरच्या मध्यावर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांत ४८ हजार ७६७ दशलक्ष घनफूट अर्थात ७४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली नव्हती. मध्यंतरी जिल्ह्यातील काही धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले होते. पर्जन्यमान कमी राहिल्याने धरणांमध्ये आधीच कमी जलसाठा असतान त्यात समन्यायी पाणी वाटपाच्या तत्वानुसार जायकवाडीसाठी पाणी द्यावे लागले. अपुऱ्या पावसामुळे पावसाळ्यात काही गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. हिवाळ्यात अशी गावे व वाड्यांची संख्या वाढत आहे. डिसेंबरच्या मध्यावर धरणांमध्ये ७४ टक्के जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ४५९३ (८२ टक्के) जलसाठा आहे. मागणीच्या तुलनेत कमी आरक्षण मिळाल्याने महापालिकेने पाणी कपातीचा विचार केला होता. परंतु, तळाकडील ६०० दशलक्ष घनफूट पाणी उचलल्यास मनपाला कमतरता भासणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते. त्यामुळे महापालिकेने महिनाभरानंतर स्थितीचा आढावा घेण्याचे ठरवले आहे.
गंगापूर धरण समुहातील काश्यपीत १८२१ दशलक्ष घनफूट (९८ टक्के), गौतमी गोदावरी १६८९ (९०), आळंदी ७४९ (९२) असा जलसाठा आहे. पालखेड धरण समुहात पालखेडमध्ये ३३३ (५१), करंजवण ४९९९६ (९३), वाघाड २०६७ (९०) तर ओझरखेड १७४९ (८२), पुणेगाव ४२७ (६९), तिसगाव २९१ (६४), दारणा ४९७७ (७०), भावली १२५५ (८८), मुकणे ५७५२ (७९), वालदेवी १०६९ (९४), कडवा १३७३ (८१), चणकापूर २३५४ (९७), हरणबारी ११३१ (९७), केळझर ५३४ (९३), गिरणा ९६४८ (५२), पुनद १३०६ (१००), माणिकपूंज १०४ (८६ टक्के) जलसाठा आहे.
दोन वर्षांतील तफावत काय ?
मागील वर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये डिसेंबरच्या मध्यावर ६३ हजार ५५८ दशलक्ष घनफूट म्हणजे ९७ टक्के जलसाठा होता. या वर्षी हे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी होऊन ७४ टक्क्यांवर आले आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ४८ हजार ७६७ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागले.