वन विभागाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित दिसू लागले असून जिल्ह्य़ात गिधाडांची संख्या वाढू लागली आहे.
‘नेचर क्लब ऑफ नाशिक’च्या अभ्यासातील निरीक्षण
लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : वन विभागाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित दिसू लागले असून जिल्ह्य़ात गिधाडांची संख्या वाढू लागली आहे. नेचर क्लब ऑफ नाशिक यांच्या वतीने तीन महिने विविध भागात फिरून गिधाडांच्या निवासाचा अभ्यास करण्यात आला. जिल्ह्य़ात गिधाडांची संख्या सुमारे १२८ झाली आहे. वन विभागाने आता वेगळ्या तंत्राच्या साहाय्याने गिधाडांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा, अशी मागणी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे करण्यात आली आहे.
गिधाड हा मृतभक्षक वर्गातील असून पक्षी, प्राण्यांचे मृतदेह खाऊन तो जगतो. गिधाडे अंटाक्र्टिका आणि ओशनिया खंड वगळता सर्वत्र आढळतात. हा पक्षी गरुडापेक्षाही मोठा आणि ताकदवान असला तरी तो शिकार न करता प्राण्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावून आपले पोट भरत असतो. त्यामुळे कासव आणि कावळा यांच्याप्रमाणेच गिधाड हा पक्षीसुद्धा ‘निसर्गातील सफाई कामगार’ म्हणून ओळखला जातो. १९९० च्या दशकात ‘डायक्लोफिनॅक’ हे औषध पशुवैद्यकीय उपचारासाठी वापरात आले. प्राण्यांच्या अवयवांवर आलेली सूज आणि त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी हे औषध वापरले जात असे. या औषधाच्या वापरातून प्राण्यांचे रोग बरे होत असले, तरी औषधातील अंश त्यांच्या शरीरभर पसरलेला असे. परिणामी, औषधाचा वापर केलेले जनावर मेल्यानंतर त्याचे दूषित मांस खाणा?ऱ्या गिधाडांच्या शरीरात या ‘डायक्लोफिनॅक’ औषधाचे विष जाऊ लागले. त्याचा गिधाडांच्या मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होऊन ती मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडली.
आपल्याकडे प्रामुख्याने दोन प्रकारची गिधाडे आढळतात. ‘ओरियन्टल व्हाइट बॅक’ म्हणजेच पांढ?ऱ्या पाठीची गिधाडे आणि दुसरी ‘इंडियन’ किंवा ‘लाँगबिल्ड’ म्हणजेच लांब चोचीची गिधाडे. पांढ?ऱ्या पाठीची गिधाडे झाडांवर, तर लांब चोचीची गिधाडे उंच डोंगरकडय़ांवर खोबणीत आपली घरटी करतात. त्र्यंबक परिसरातील अंजेनेरी, हरिहर, वाघेरा, ब्रह्मगिरी, भास्करगड आदी परिसरात गिधाडांचे वास्तव्य आहे. सालबारीच्या रांगेतील अजिंठा सातमाळा उपरांगेतील समुद्रसपाटीपासून ४०२९ फूट उंच असलेला कळवण तालुक्यातील अहिवंत किल्लय़ावर गिधाडाची दोन घरटी आणि चार पक्षी आढळून आल्याचे नेचर क्लब ऑफ नाशिकने नोंदविले आहे. तसेच पेठ, हरसूल, सुरगाणा, घोटी, इगतपुरी या आदिवासी भागात गिधाडांचे प्रमाण जास्त बघावयास मिळाले.
पिसे नसलेले केसरहित डोके हे बहुतांश गिधाडांचे वैशिष्टय़ आहे. गिधाडे हा अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. उत्क्रांतीमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी (बाकदार चोच, टोकदार नखे इत्यादी) जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. त्यांच्या डोक्यावर पिसे नसतात. डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांस खाणे सोपे होत असावे. सर्व गिधाडे मुख्यत्वे उंच आकाशात विहार करत असतात. साधारणपणे कळपात एकमेकांपासून अंतर ठेवून विहार करणे पसंत करतात. भिन्नभिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात. प्राचीन साहित्यातही गिधाडांचा उल्लेख आढळून येतो. याविषयी संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी माहिती दिली. तीन वर्षांत गिधाडांची संख्या नाशिक जिल्ह्यत वाढल्याचे चित्र आम्हास बघावयास मिळाले. जिल्ह्यतील विविध गड, किल्लय़ांवर गिधाडे दिसली. आदिवासी भागात प्रमाण जास्त आहे.