नाशिक: पर्यटकांसमोर नृत्यासाठी आदिवासी मुलींवर बळजोरी; खासगी वसतिगृहाविरुध्द गुन्हा

मुलींकडून आदिवासी नृत्याचा सराव करुन हॉटेल किंवा अन्य ठिकाणी नाचण्यासाठी पाठविले जात असल्याची तक्रार पाच मुलींनी केली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने गावाजवळील चिखलवाडी येथील खासगी संस्थेच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना पर्यटकांसमोर जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडल्याचा आरोप करीत पालकांनी संस्थेचे चालक तसेच संबंधित शिक्षिकेविरुद्ध तक्रार केल्यावर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामुंडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्र येथे काही आदिवासी विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. आठवी ते दहावीच्या या विद्यार्थींनी आहेत. त्यांना संगणकाचे प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगत निवासी शाळेत उन्हाळी सुट्टीत थांबविण्यात आले. त्यासाठी साडेतीन हजार रुपये शुल्क घेण्यात आले. या संस्थेच्या शाळेमागील टेकडीवर एक हॉटेल आहे. या ठिकाणी काजवे पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. त्या पर्यटकांसमोर सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत विद्यार्थिनींना नाचण्यास सांगितले जाते. न नाचल्यास शिक्षिका संस्थाचालकांच्या सांगण्यावरुन दमदाटी करतात, छड्या देतात, अशी तक्रार मुलींनी पालकांकडे केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी मुलींना घरी आणण्याची भूमिका घेतली. रविवारी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित मुलींना आता दुसऱ्या शाळेत दाखल केल्याचे पालकांनी सांगितले.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

दरम्यान, याविषयी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक पाटील यांनी आदिवासी मुलींना रिसोर्ट किंवा अन्य ठिकाणी नाचविण्यात आले नसल्याचे सांगितले. त्या परिसरात कुठेही रिसोर्ट नाही. मुलींना निवासी आश्रम शाळेतच नृत्याचे प्रशिक्षण दिले जात होते. मुली चुकल्यास शिक्षिका त्यांना छडीने मारहाण करीत. सध्या मुली पालकांच्या ताब्यात असून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे नमूद केले.

हे वाचले का?  अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात

त्र्यंबकेश्वर पुन्हा चर्चेत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या पाल्यांसाठी असणारे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आधारतीर्थ आश्रम पाच वर्षाच्या बालकाच्या मृत्यूमुळे चर्चेत आले होते. त्यानंतर आता सामुंडी परिसरातील सर्वहारा परिवर्तन केंद्रामुळे त्र्यंबक, इगतपुरी चर्चेत आले आहे. या केंद्राला महिला व बाल कल्याणची मान्यता नसतांना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संशयित राजीव नाईक हा आश्रमशाळा चालवतो. नऊ ते १५ वयोगटातील २५ मुली सध्या या ठिकाणी आहेत. या मुलींना संगणकाचे प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगत उन्हाळी सुट्टीतही आश्रमशाळेत राहण्यास भाग पाडले. मात्र मुलींकडून आदिवासी नृत्याचा सराव करुन हॉटेल किंवा अन्य ठिकाणी नाचण्यासाठी पाठविले जात असल्याची तक्रार पाच मुलींनी केली. त्यामुळे मुलींच्या पालकांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार केली.

हे वाचले का?  पुण्यातील फुलेवाडा प्रतिकृतीसाठी नाशिकमध्ये जागा – मुख्यमंत्री