राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मातृभाषा असलेल्या मराठीची प्रश्नपत्रिका सोडवताना नाशिक विभागात नक्कल करताना दोन जणांना पकडण्यात आले.
नाशिक – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मातृभाषा असलेल्या मराठीची प्रश्नपत्रिका सोडवताना नाशिक विभागात नक्कल करताना दोन जणांना पकडण्यात आले. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ही प्रकरणे आहेत.
विभागातून दहावीच्या परीक्षेस एक लाख ६० हजार विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. नाशिक जिल्ह्यात ५९ परीक्षा केंद्र असून दोन हजार ८०२ शाळांमध्ये परीक्षा सुरू आहे. परीक्षा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्राजवळ असलेल्या पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून गस्ती पथकांनाही आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती. मराठी विषय असल्याने लिखाणासाठी वेळेचे नियोजन व्यवस्थित करा, प्रवेशपत्र आणले का, एकापेक्षा जास्त पेन बरोबर ठेवा, अक्षर चांगले काढा, यासह अन्य सूचनांचा मारा पालकांकडून विद्यार्थ्यांवर करण्यात येत होता.
दरम्यान, नाशिक तसेच जळगाव जिल्ह्यातून प्रत्येकी एक याप्रमाणे नक्कल करण्याची दोन प्रकरणे घडली. मंडळाच्या वतीने सातत्याने कॉपीमुक्त परीक्षा, गैरमार्गाशी लढा अशा विविध माध्यमातून मुलांच्या मनातील परीक्षेविषयी असणारी भीती कमी करण्याचा प्रयत्न होत असला तरी गुणांच्या शर्यतीत टिकाव लागण्यासाठी विद्यार्थ्यांकडून नक्कल करण्याचा मार्ग पत्करला जात असल्याचे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडवितानाही दिसून आले.