सावरकरनगर येथील रहिवासी पुष्कराज थोरातला भारतीय नौदल प्रबोधिनीकडून वैमानिक प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे पत्र प्राप्त झाले.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: नौदलातील वैमानिकाच्या जीवनावर आधारीत टॉप गन या हॉलिवूडच्या चित्रपटाने जगभरातील तरुणाईला भुरळ घातलेली असताना नाशिकचा पुष्कराज थोरात हा तरुण देखील भारतीय नौदलात वैमानिक होऊन आपले स्वप्न साकार करणार आहे.
सावरकरनगर येथील रहिवासी पुष्कराज थोरातला भारतीय नौदल प्रबोधिनीकडून वैमानिक प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे पत्र प्राप्त झाले. तो १७ जूनला केरळमधील एझिमाला येथे नौदल प्रबोधिनीत प्रशिक्षणासाठी दाखल होत आहे. त्या ठिकाणी तो सहा महिने उड्डाणाचे प्राथमिक शिक्षण घेईल. नंतर एक वर्ष हैद्राबाद येथील हवाई दल प्रबोधिनीत प्रत्यक्ष उड्डाणाचे प्रशिक्षण घेईल.
या १८ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तो नौदलात वैमानिक बनून देश सेवेत रुजू होईल. त्याची नौदलाच्या हवाई दलाच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन – पायलट या प्रवेश प्रक्रियेद्वारे निवड झाली आहे, दोन वर्षांपासून तो सुदर्शन अकॅडमीच्या हर्षल आहेरराव यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करत होता. यासाठीची एसएसबी मुलाखत त्याने बंगळुरु येथे यशस्वीरित्या उत्तीर्ण केली होती. पुष्कराज सध्या क. का. वाघ महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला शिकत असून १६ जूनला त्याची अंतिम परीक्षा संपत आहे. दुसऱ्या दिवशी १७ तारखेला तो नौदल प्रबोधिनीत आपल्या प्रशिक्षणासाठी दाखल होत आहे.
पुष्कराजचे वडील अनिल थोरात हे सध्या संगमनेर येथे महावितरण कंपनीत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असून आई पूनम थोरात या मानसशास्त्रीय सल्लागार आहेत. पुष्कराजने महाविद्यालयीन जीवनात क्रिकेट आणि व्हॉलिबॉल या खेळांत विशेष प्रावीण्य मिळविले आहे. योग्यवेळी योग्य मार्गदर्शनाखाली तयारी केल्यामुळे अंतिम वर्षाच्या निकालापूर्वीच पुष्कराजचे नौदल प्रबोधिनीत वैमानिकासाठीचे प्रशिक्षण सुरू होत आहे. इतर तरुणांनीही लवकरात लवकर ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न करावे आणि पुष्कराज प्रमाणे कमी वयात मोठे ध्येय गाठावे, अशी भावना हर्षल आहेरराव यांनी व्यक्त केली.