नाशिक पूर्वमध्ये भाजप-शरद पवार गटात वाद; वाहनाची तोडफोड, पैसे वाटपाची तक्रार

भाजपकडून खुलेपणे गुंडागर्दी होत असून त्यास पायबंद न घातल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यातील संघर्ष आता हातघाईवर आला असून उमेदवार गणेश गिते यांच्या कार्यकर्त्याकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. दुसरीकडे, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गिते यांच्या भावाच्या वाहनाची तोडफोड केल्याची तक्रार करण्यात आली आहे. भाजपकडून खुलेपणे गुंडागर्दी होत असून त्यास पायबंद न घातल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार राहुल ढिकले आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) गणेश गिते यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. गुरुवारी दुपारी त्रिकोणी गार्डन परिसरात घडलेल्या घटनेवरून दोन्ही पक्षांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. गिते यांचे कार्यकर्ते पैसे वाटप असल्याची ढिकले समर्थकांची तक्रार आहे तर, संबंधितांकडून मतदार चिठ्ठीचे वाटप होत असल्याचे गिते समर्थकांचे म्हणणे आहे. उपरोक्त ठिकाणी उमेदवाराचे भाऊ गोकुळ गिते हे पोहोचले. तेव्हा त्यांच्या वाहनावर भाजप पदाधिकाऱ्यांनी हल्ला करून तोडफोड केल्याची तक्रार शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यानी केली.

हे वाचले का?  दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

या घटनाक्रमामुळे खासदार सुप्रिया सुळे यांची जाहीर सभा होऊ शकली नाही. त्यांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेत आयुक्तांची भेट घेतली. नाशिकमध्ये घडलेला प्रकार धक्कादायक असून भाजपकडून खुलेआम गुंडागर्दी केली जात असल्याचा आरोप सुळे यांनी केला. पोलिसांसमोर ही घटना घडली. उमेदवाराचा भाऊ गोकुळ गिते हे शांतपणे प्रचार, चिठ्ठी वाटप करीत होते. तेव्हा हल्ला करण्यात आला. सत्ताधारी आमच्या लोकांवर हल्ले करीत आहेत. भाजपचे खासदार भर सभेत महिलांना धमकावतात. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, असा प्रश्न त्यांनी केला. नाशिकसह राज्यात आमचे उमेदवार व पदाधिकाऱ्यांबाबत पुन्हा असे प्रकार घडल्यास गृहमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा सुळे यांनी दिला.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

शरद पवार गटाचे आरोप भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांनी फेटाळले. नाशिक पूर्व मतदारसंघात सर्रास पैश्यांचा वापर होत आहे. हे थांबले पाहिजे. महापालिकेत सर्वात मोठा घोटाळा केलेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार असल्याचा आरोप ढिकले यांनी केला. त्रिकोणी गार्डन परिसरात गितेंचा कार्यकर्ता पैसे वाटत होता. स्थानिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. गितेंच्या भावाने कार्यकर्त्याला वाचविण्याचा, पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आपली बदनामी करण्यासाठी हा प्रकार होत आहे. उघडउघड पैश्यांचा वापर कुठे होते हे जनतेला माहिती असल्याकडे ढिकले यांनी लक्ष वेधले.

फडणवीस यांच्या घरासमोर उपोषण करु- सुप्रिया सुळे

सत्ताधारी आमच्या लोकांवर हल्ले करीत आहेत. भाजपचे खासदार भर सभेत महिलांना धमकावतात. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, असा प्रश्न त्यांनी केला. नाशिकसह राज्यात आमचे उमेदवार व पदाधिकाऱ्यांबाबत पुन्हा असे प्रकार घडल्यास गृहमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग