नाशिक: बँक अधिकाऱ्यांनी गुन्हे तपासात सहकार्य करणे गरजेचे, पोलिसांचे आवाहन

आभासी पध्दतीने व्यवहार करतांना बँक खातेदारांनी जागरूक असणे गरजेचे आहे. ओटीपी, सीव्हीव्ही, क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक, वैयक्तीक माहिती ग्राहकांनी कोणालाही देऊ नये.

नाशिक: बँक आणि एटीएमशी संबंधित गुन्ह्याबद्दल बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. गुन्ह्यांचा तपास सुरू असतांना बँक अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिसांशी समन्वय साधत तपासात सहकार्य करावे, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी हेमंत पाटील यांनी केले. दिवसेंदिवस वाढत असलेल्या आभासी फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या सायबर विभागाच्या वतीने जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली. यावेळी राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे २५ मुख्य अधिकारी उपस्थित होते.

हे वाचले का?  महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा

पाटील यांनी मार्गदर्शन केले. वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांविषयी बँक खातेदारांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे. सातत्याने घडणाऱ्या बँकेशी संबंधित गुन्ह्यांची माहिती पोलिसांना देण्याची गरज आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सदर मोहीम राबवली जात असून यात बँकांचीही भूमिका महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाल्यास संबंधिताने वेळेत पोलिसांत तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. तक्रार दाखल होताच ज्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, ते बँक खाते पोलिसांकडून गोठवले जाते. अशावेळी बँकांनीही तत्परता दाखवणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

हे वाचले का?  Budget 2024 :पदकवीर दोघेच! अर्थसंकल्पात बिहार, आंध्रवर मेहेरनजर, महाराष्ट्र ‘कोरडा’च!, रोजगारनिर्मितीसा अनेक योजना

ग्राहकांनी खबरदारी घ्यावी

ग्राहकांची आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने पोलीस तसेच बँकेशी संपर्क करावा. आभासी पध्दतीने व्यवहार करतांना बँक खातेदारांनी जागरूक असणे गरजेचे आहे. ओटीपी, सीव्हीव्ही, क्रेडिट, डेबिट कार्ड क्रमांक, वैयक्तीक माहिती ग्राहकांनी कोणालाही देऊ नये. प्रलोभन दाखविणाऱ्या विविध गुंतवणूक योजना, कर्ज, कोणतीही फसवणूक करणारी लिंक या माहितीची खातरजमा बँकेकडून करण्यात यावी. केंद्र शासनाने ऑनलाईन फसवणूक संदर्भात १९३० हेल्पलाईन आणि सायबरक्राईम डाॅट जीओव्ही डाॅट इन हे संकेतस्थळ सुरू केले आहे. फसवणूक झाल्यास त्वरीत यावर संपर्क साधावा.