ग्राहकांना दर्जेदार अन्न पदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे.
नाशिक: दीपावलीच्या पार्श्वभूमिवर दुग्धजन्य पदार्थांसह मिठाईला असणारी मागणी लक्षात घेऊन या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाणही वाढत असते. मिठाईसह इतर पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क झाला असून संबंधित विभागाने केलेल्या कारवाईत एक कोटी ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ग्राहकांना दर्जेदार अन्न पदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने काळजी घेण्यात येत आहे. या अनुषंगाने नाशिक येथील मे. मधुर फुड प्लाझा येथे छापा टाकत विक्रीसाठी प्लास्टिकच्या डब्यात साठवलेल्या श्रीखंडाची तपासणी करण्यात आली. श्रीखंडाच्या पिशवीवर तुकडी (बॅच) नंबर, उत्पादन केल्याची तारीख, पदार्थ बाद तारीख, पदार्थ कुठे व कोणी केला, पत्ता याची माहिती नसल्याचे समोर आले. या साठ्यातील नमुना मागवत शिल्लक ६१.५ किलो माल लेबलदोषयुक्त असल्याने तसेच अप्रमाणित असल्याच्या संशयावरून अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी जप्त केला.
सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील मे. इगल कॉर्पोरेशन येथे करण्यात आलेल्या तपासणीत खुले खाद्यतेल तसेच पुनर्वापर केलेल्या डब्यांमधून खाद्यतेलाची विक्री आणि भेसळीच्या संशयावरून अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी माल जप्त केला. रिफाइंड सोयाबीन तेलाचे पुनर्वापर केलेले ४१ डबे (एकूण ६१३.४ किलो), रिफाइंड पामोलिन तेलाचे पुनर्वापर केलेले २८ डबे (४१८.४ किलो) असा एक कोटी, ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक आयुक्त विनोद धवड, उदयदत्त लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.