नाशिक : मतदानासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात, गैरप्रकार रोखण्यासाठी ४४ भरारी पथके

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार असून या अनुषंगाने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार असून या अनुषंगाने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता प्रचार संपणार असून यानंतर होणारे लक्ष्मी दर्शन, अवैधरित्या होणारी मद्याची देवाणघेवाण तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दोन्ही मतदारसंघात भरारी पथके व अन्य यंत्रणा लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागरिकांना मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक उपायांची अंमलबजावणी सुरू आहे. अपंग, ज्येष्ठ यांच्यासाठी खास व्यवस्था आहे. मतदानापूर्वी मद्य, पैसा, वस्तू वाटप यांसह अन्य गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी दोन्ही मतदारसंघात ४४ भरारी पथके, ८२ स्थायी पथके, २४ चलचित्र सर्वेक्षण पथके, १२ चलचित्र निरीक्षण पथके, १६ पथके आंतरजिल्हा, आंतरराज्य तपासणी नाक्यासह सज्ज आहेत. भरारी व स्थायी पथकांमध्ये केंद्रीय पोलीस दलाचे सदस्य यांचा सहभाग आहे.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका

जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे पोहोचविण्यासाठी ५७० बस आणि एक हजार २५२ इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ९५५ केंद्रांवर तर, दिंडोरी मतदारसंघात ९६१ केंद्रावर वेबकास्टिंगची पूर्वतयारी करण्यात आली आहे. २४० सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून त्यांचा अहवाल मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर करतील. नाशिक जिल्ह्यात ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या एक हजार ६११ तसेच २३७ अपंग मतदारांच्या घरी जाऊन मतदान झाले आहे. मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी वापरण्यास मनाई आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच सर्व खासगी आस्थापना यांना शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

जिल्ह्यातील मतदार संख्या

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दिंडोरीसाठी १८ लाख ५३ हजार ३८७ तर नाशिकसाठी २० लाख ३० हजार १२४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात दोन हजार ३१७ ठिकाणी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून ६२२ मतदारांना वाहतूक सुविधा पुरविण्याची पूर्वतयारी आहे. यामध्ये नाशिकसाठी एक हजार ९१० तर दिंडोरीमधील एक हजार ९२२ केंद्रावर १७ हजार २८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये पाच हजार ८२ महिला कर्मचारी आहेत.

हे वाचले का?  अंबड गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजरचा शोध; पोलिसांची खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तयारी, ठाकरे गटाचा आरोप

बंदोबस्ताची तयारी

नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन तर, दिंडोरी मतदारसंघात चार मतदान केंद्र संवेदनशील असून सर्व केंद्रावर केंद्रीय अर्धसैनिक दल, राज्य राखीव पोलीस दलासह पोलीस आयुक्त नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, जिल्हा समादेशक होमगार्ड यांच्यामार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.