नाशिक : मनपाचा अनोखा खेळ; नागरी तक्रारींच्या निपटाऱ्याऐवजी टोलवाटोलवी

आलेली तक्रार प्रलंबित ठेवणे, नंतर अकस्मात कारवाई झाल्याचे सांगून ती बंद करणे, तक्रारदाराला कारवाईची कुठलीही माहिती न देणे, ही माहिती हवी असल्यास नव्याने तक्रार करायला सांगून ताटकळत ठेवण्याचे प्रकार घडत आहेत.

नाशिक – शहरातील वेगवेगळ्या समस्या आणि प्रश्नांबाबत जागरुक नागरिक भ्रमणध्वनी ॲप, ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात तक्रारींद्वारे महापालिकेकडे दाद मागत असले तरी या तक्रारींच्या निपटाऱ्याचा अनोखा खेळ खेळला जात असल्याचे काही उदाहरणांवरून समोर आले आहे.

आलेली तक्रार प्रलंबित ठेवणे, नंतर अकस्मात कारवाई झाल्याचे सांगून ती बंद करणे, तक्रारदाराला कारवाईची कुठलीही माहिती न देणे, ही माहिती हवी असल्यास नव्याने तक्रार करायला सांगून ताटकळत ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. इतकेच नव्हे तर, प्राप्त झालेल्या तक्रारीचा कुठलाही विचार न करता भलतीच कारवाई करून तक्रारींचा निपटारा केला जात आहे.

भ्रमणध्वनी ॲपमुळे नागरिकांना महापालिकेकडे तक्रार करणे सोपे झाले. येणाऱ्या तक्रारी विशिष्ट मुदतीत सोडविल्या जाणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात तसे घडत नाही. आपल्या तक्रारीचा तक्रारदाराला पाठपुरावा करावा लागतो. तरीदेखील यंत्रणा ढिम्म राहते. संबंधित विभाग टोलवाटोलवी करण्यात धन्यता मानतात. असे अनुभव तक्रारदारांना येत आहेत. संभाजी चौक भागातील मॅग्मो प्रकाश हौसिंग सोसायटीतील एका बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी स्थानिक रहिवासी अंजली बुटले या काही वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. या बाबत प्रारंभीच्या तक्रारीनंतर मनपा कर्मचाऱ्यांनी जागेची पाहणी केली. तक्रारदाराशी चर्चा करून संबंधित बांधकामाची कागदपत्रे तपासून नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे मनपाने म्हटले होते. नंतर ही तक्रार प्रलंबित गटात असली तरी योग्य कारवाई केली जाईल असे सांगितले गेले होते.

हे वाचले का?  नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अखेर ठाकरे गटाकडे; डॉ. हेमलता पाटील बंडखोरीच्या तयारीत

अधिक माहितीसाठी बुटले यांनी दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता माहिती दिली गेली नाही. उलट माहिती हवी असल्यास नवीन तक्रार करण्यास सांगितले गेले. त्यात आधीच्या तक्रारीवर काय कारवाई केली, केली असल्यास पूर्ण झाली का, सामाईक भिंतीवर बांधलेले अनधिकृत बांधकामाचे खांब तसेच असल्याचे बुटले यांनी निदर्शनास आणून दिले. पुढील काळात तक्रारीवर टोलवाटोलवी पलीकडे फारसे काही होत नसल्याची अनुभूती त्यांना येत आहे. मनपाचे कर्मचारी पुन्हा पाहणी करून गेले.

हे वाचले का?  पंतप्रधानांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन, तपोवनातील मैदानावर जय्यत तयारी

अतिक्रमण निर्मुलन विभागाने नाशिक पश्चिम विभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार ही तक्रार खासगी जागेतील असल्याने तिच्यावर नगर नियोजन विभागाकडून कारवाई केली जाईल असे सांगितले. अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल, या आशेवर असलेल्या तक्रारदाराला मनपाच्या उत्तराने धक्का बसला. नगर नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई झाल्याचे सांगत तक्रार निकाली काढली. परंतु, अनधिकृत बांधकामावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने बुटले यांनी पुन्हा तक्रारीद्वारे संबंधितांचे लक्ष वेधले आहे.

अजब कारवाई…

श्री रविशंकर रस्त्यावरील अनधिकृत मांस विक्रीबद्दल मनपाच्या ॲपवर स्वप्निल गायकवाड यांनी तक्रार केली होती. या अनुषंगाने छाननी होऊन अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई होणे अपेक्षित होते. महापालिकेने संबंधितांऐवजी परिसरातील भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची करामत केली. पशूसंवर्धन विभागाअंतर्गत पथकामार्फत मोकाट कुत्रे पकडण्याची कारवाई करण्यात आल्याचे उत्तर देऊन तक्रार निकाली काढण्यात आली. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद असून त्यातून संबंधित अधिकाऱ्यांची असंवेदनशील वृत्ती दिसून येत असल्याचे तक्रारदार गायकवाड यांनी म्हटले आहे. आपल्या तक्रारीवरून मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्याऐवजी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदविला. वरिष्ठ अधिकारी प्राप्त तक्रारींवर झालेल्या कारवाईची शहानिशा करीत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

हे वाचले का?  सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित