नाशिक: मनपाची पटसंख्या वाढीसाठी ‘मिशन ॲडमिशन’ मोहीम

शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले.

नाशिक – नवीन शैक्षणिक वर्ष प्रवेशोत्सव महापालिका शाळांमध्ये उत्साहात झाला असताना दुसरीकडे, पटसंख्या वाढविण्यासाठी ‘मिशन ॲडमिशन’ मोहीम सुरु करण्यात आली असून प्रत्येक वर्गात किमान ५० विद्यार्थी असे उद्दिष्ट मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला देण्यात आले आहे.

शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. मुलांचे औक्षण करुन फुले आणि खाऊ देण्यात आला. मनपा शाळांची पटसंख्या वाढविण्याचे ध्येय मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर आहे. मनपाच्या प्राथमिक ८८ आणि माध्यमिक १२ अशा एकूण १०० शाळा आहेत. सुमारे २९ हजार पटसंख्या आहे. मिशन ॲडमिशन मोहीम यशस्वीपणे राबवून पटसंख्या ५० हजारपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. या मोहिमेत ८९६ शिक्षक सहभागी आहेत. बहुतांशी शाळांमध्ये मोफत गणवेशाचे आणि पुस्तक वाटपाचे काम सुरु आहे. तसेच नजीकच्या काळात मनपा शाळेतील सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही मनपामार्फत गणवेश पुरविण्यात येणार आहेत.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीची नाशिकमध्ये तयारी

स्मार्ट स्कूलचा ‘स्मार्ट’ वर्ग

महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत नाशिक स्मार्ट सिटीमार्फत ६९ शाळांचे ६५६ वर्गांचे डिजिटायझेशन होणार आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे मनपाच्या शाळांना उर्जितावस्था प्राप्त करुन देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काठे गल्ली येथील मनपा शाळा क्र. ४३ मध्ये पथदर्शी म्हणून आठ स्मार्ट वर्ग सुरु झाले आहेत. मुलांनी वर्गात बसून ई वर्गाचा आनंद लुटला. या वर्गात पारंपरिक फळ्यासोबतच स्मार्ट बोर्ड, नवीन बाकडे, इंटरनेट सेवा, डिजिटल अभ्यासक्रम, अशा शैक्षणिक सुविधा आहेत. संपूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रंगकाम करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त शाळेत २१ संगणकांचा एक कक्ष विकसीत करण्यात आला आहे. उर्वरीत ६८ शाळांमध्ये याच धर्तीवर काम प्रगतीपथावर आहे.

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम