नाशिक : मनपा शाळा स्मार्ट करण्यासाठी ५० कोटींचा निधी, गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात दादा भुसे

महानगरपालिकेच्या सर्व शाळांना स्मार्ट स्कूल बनविण्यात येणार आहे. त्यासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

नाशिक – जिल्हा परिषदेच्या १२८ शाळा आदर्श (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित करण्यात येत आहेत. येत्या वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. महानगरपालिकेच्या सर्व शाळांना स्मार्ट स्कूल बनविण्यात येणार आहे. त्यासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

शहरातील गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी उपस्थित होते. तंत्रज्ञानाचे जाळे वेगाने विस्तारले असल्याने डिजिटल युगात भविष्यातील नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही भुसे यांनी दिली. यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण समित्यांनी, तेथील शिक्षकांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडिलांनंतर शिक्षकांचे स्थान महत्वपूर्ण असते. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीत असतात. अथक परिश्रम व ज्ञानार्जनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे, असे भुसे यांनी नमूद केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कामातून प्रेरणा घेऊन इतर शिक्षकांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले

हे वाचले का?  लाच स्वीकारताना वेतन भविष्य निर्वाह निधी पथकची महिला अधिकारी जाळ्यात

आमदार हिरे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी प्रास्ताविकात जिल्हा परिषदेच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात गुणवंत शिक्षक म्हणून प्रमिला पगार, वैशाली जाधव, अर्चना आहेर, नौशाद अब्बास, चित्रा देवरे, अनिल शिरसाठ, प्रतिभा अहिरे, देवेंद्र वाघ, उत्तम पवार, राजकुमार बोरसे, रवींद्र खंबाईत, संतोष झावरे, परशराम पाडवी, बालाजी नाईकवाडी, अर्चना गाडगे यांना सन्मानित करण्यात आले.

हे वाचले का?  यादीतील एक हजारपेक्षा अधिक जणांना प्रतीक्षा, सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया