नाशिक: महाज्योतीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचे बळ; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत टॅब वाटप

ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत टॅबचे वितरण करण्यात येत आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत टॅबचे वितरण करण्यात येत आहे. या टॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना टॅब वाटप कार्यक्रमात पालकमंत्री भुसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, इतर मागास बहुजन कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डॉ. भगवान वीर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, महाज्योती नाशिकच्या प्रादेशिक अधिकारी सुवर्णा पगार, आय एम. आर. टी. चे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी, शिक्षण अधिकारी (मविप्र) डॉ. विलास देशमुख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे यांनी ग्रामीण व शहरी भागातील ज्या गरजू विद्यार्थ्यांना आधुनिक भ्रमणध्वनी मिळू शकत नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत टॅबचे वितरण करण्यात येत असल्याचे सांगितले. या टॅबसोबत दररोज सहा जीबी इंटरनेटचा डाटा एक वर्षासाठी मिळणार आहे. जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या ग्रामीण व शहरी भागातील ज्या विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, अशा ५९३ विद्यार्थ्यांना जेईई, नीट सीईटी परीक्षांच्या अभ्यासाकरीता टॅबचे वाटप करण्यात आले. या टॅबचा वापर विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठीच करावा, असा सल्लाही भुसे यांनी दिला.

हे वाचले का?  नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव

राज्य शासन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यावर भर देत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन त्या शाळांचा स्तर उंचावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने अंगणवाडी, बालवाडीतील विद्यार्थ्याची दर तीन महिन्यांनी आरोग्याची नियमित तपासणी करण्यात येणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना आरोग्य कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यावर्षापासून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींनाही प्रवेश मिळणार आहे. राज्यातील मुलींना या प्रबोधिनीत भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत राज्यातील मुलींची संख्या वाढणार असून त्या आपल्या जिल्ह्यासह राज्याचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला.

हे वाचले का?  Video: कसारा घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रेलरची पाच मोटारींना धडक, १४ जण जखमी

जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध होण्याकरिता सुपर ५० हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या उपक्रमातून ग्रामीण भागातील ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पुढील शिक्षणासाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. शासन व प्रशासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. तसेच विद्यार्थी जीवनात घेतलेले निर्णय हे आयुष्याला दिशा देणारे असतात, त्यामुळे विद्यार्थी दशेत घेतलेला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेण्यात यावा. त्याचप्रमाणे जीवनात आई-वडील, गुरुजनांचा सन्मान करून व्यसनापासून स्वतःला दूर ठेवावे, असे आवाहनही भुसे यांनी केले.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!