नाशिक-मुंबई महामार्ग सहापदरी काँक्रिटचा करण्याची गरज; छगन भुजबळ यांचे नितीन गडकरी यांना साकडे

खड्डे, अनेक ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात आदींमुळे काही महिन्यांपासून मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक ते वडपे हा भाग चर्चेत राहिला आहे.

नाशिक: खड्डे, अनेक ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात आदींमुळे काही महिन्यांपासून मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक ते वडपे हा भाग चर्चेत राहिला आहे. या भागादरम्यान महामार्ग सहापदरी काँक्रिटीकरणाचा करावा आणि हे काम सुरू होईपर्यंत या टप्प्याचे नुतनीकरण करावे, अशी मागणी माजीमंत्री आ. छगन भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जातो. गडकरी यांच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे त्याची जबाबदारी आहे. महामार्गाच्या दुरवस्थेवरून राजकीय पातळीवर परस्परांना खिंडीत गाठण्याची संधी साधली जात आहे.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू

महामार्ग विस्ताराची गरज मांडताना तो काँक्रिटचा करण्याचा आग्रह भुजबळ यांनी गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात धरला आहे. काही वर्षांपूर्वी खुद्द गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे हा महामार्ग सहापदरी काँक्रिटचा करण्याची घोषणा केली होती. त्याची आठवण करून देत भुजबळ यांनी लवकरात लवकर महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर करावे, अशी मागणी केली. नाशिक ते मुंबई हा चारपदरी महामार्ग आहे. अतिशय रहदारीच्या महामार्गाची बिकट अवस्था झालेली आहे. शहापूर ते वडपे परिसरात उड्डाणपूल नसल्याने या ठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा निर्माण होतो. जलद शहरीकरणासह, मुंबईशी समीपता आणि शहापूर तालुक्यातील लॉजिस्टिक्स पार्क यामुळे अवजड वाहने, कंटेनरची वर्दळ असते. वाहतूक कोंडीत या भागात अन्य वाहनांचा खोळंबा होतो. त्यामुळे हा महामार्ग सहापदरी होणे आवश्यक आहे. मात्र त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा मंजूर करून प्रत्यक्षात काम सुरु होण्यास लालफितीच्या कारभारामुळे विलंब होईल. महामार्गाची दुरवस्था झाल्यामुळे नुतनीकरण होईपर्यंत महामार्गाच्या संपूर्ण लांबीमधील कामाचे तात्काळ नुतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. सहापदरी महामार्गाचे काम होईपर्यंत या संपूर्ण महामार्गाच्या नुतनीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.

हे वाचले का?  महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

दुरवस्थेस टोल कंपन्यांची अनास्था कारक

या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम २०१४ मध्ये झालेले आहे. टोलवसुली कंत्राटदराने दर पाच वर्षांनी रस्त्याचे संपूर्ण बळकटीकरण करण्याची अट कामाच्या आदेशात आहे. मात्र संबधित कंपन्यांकडून करारातील अटी-शर्तीनुसार सुधारणा केली जात नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याचा आक्षेप छगन भुजबळ यांनी नोंदविला. रस्त्यात अनेक ठिकाणी उंचवटे व खोलगट भाग तयार झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

हे वाचले का?  नाशिक शहरात मतदान केंद्र बदलल्याने गोंधळ, जिल्ह्यात दोन तासांत ६.९३ टक्के मतदान