नाशिक मध्य प्रमाणे नांदगाव या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मतदारसंघाची वाटचाल मैत्रीपूर्ण लढतीच्या दिशेने होत आहे.
नाशिक : ज्या पक्षाचा विद्यमान आमदार, त्याला ती जागा असे सूत्र महायुतीने जवळपास निश्चित केले असल्याने हिरमोड झालेल्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार) इच्छुकांकडून मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव मांडला गेला आहे. परंतु, एखाद्या जागेवर हा प्रयोग केल्यास संपूर्ण राज्यात तसेच घडू शकते, याची धास्ती पक्षाचे प्रमुख अजित पवार यांना आहे. यामुळे हा प्रस्ताव धुडकावला गेल्याचे सांगितले जाते.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कुठल्याही क्षणी उमेदवारी जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. सत्ताधारी महायुतीतील प्रबळ इच्छुकांनी मैदानात उतरण्यासाठी विविध पर्याय अजमावण्यास सुरुवात केली आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह त्याचाच एक भाग. महायुतीत नाशिक मध्य विधानसभेची जागा भाजपकडे आहे. देवयानी फरांदे या सलग दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. मित्रपक्षाकडील ही जागा मिळणे अशक्यप्राय झाल्यामुळे काही इच्छुकांनी अजित पवार यांच्यासमोर मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी मागितली होती. परंतु, दादांनी त्यास तत्काळ नकार दिला. असे करता येणार नसल्याचे बजावले. एखाद्या जागेवर असा प्रयोग केल्यास संपूर्ण राज्यात महायुतीत मैत्रीपूर्ण लढती होतील, याची जाणिव त्यांनी इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांना करून दिली. भाजप सलग दोन ते तीन वेळा निवडून आलेल्या आपल्या काही आमदारांची उमेदवारी बदलण्याच्या विचारात आहे. अशावेळी एखाद्या जागेवर त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्यास ती जागा अजित पवार गटाला मिळू शकेल, या आशेवर इच्छुक कुंपणावर बसून लक्ष ठेवून आहेत.
नाशिक मध्य प्रमाणे नांदगाव या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मतदारसंघाची वाटचाल मैत्रीपूर्ण लढतीच्या दिशेने होत आहे. अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ हे या मतदारसंघात दीड-दोन महिन्यांपासून तयारी करीत आहेत. छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे सुहास कांदे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. याआधी भुजबळांचे पुत्र पंकज हे दोनवेळा या जागेवर विजयी झाले होते. पंकज यांची विधान परिषदेवर वर्णी लावत काकांनी हा मतदारसंघ पुतण्या समीरला खुला करून दिल्याचे मानले जाते. अलीकडेच भुजबळ कुटुंबियांनी नांदगावमध्ये समीर यांच्या वाढदिवसानिमित्त अजय-अतूल यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन करीत मतपेरणीला सुरुवात केली. भुजबळ यांनी समीर आणि पंकज यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन नांदगावकरांना केले होते. या मतदारसंघात पक्षाकडून मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मिळो किंवा न मिळो, आमदार कांदेंना धडा शिकविण्यासाठी रिंगणात उतरण्याचा चंग भुजबळ कुटुंबियांनी बांधल्याचे दिसून येते. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंनीही समीरऐवजी स्वत: छगन भुजबळांनी नांदगावमधून लढण्याचे आव्हान दिले आहे. या घटनाक्रमाने जिल्ह्यात काही जागांवर महायुतीतील पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती वा बंडखोरी होण्याची चिन्हे असून संबंधितांना आवर घालताना पक्ष नेतृत्वाची दमछाक होणार आहे.
हेही वाचा : डाळिंब, कांदा व्यापाऱ्यांची परप्रांतीयांकडून फसवणूक
पदाधिकाऱ्यांचा उत्साह
महायुतीतील घटक पक्षांच्या वाट्याला कोणता मतदारसंघ येईल ते अनिश्चित असताना राष्ट्रवादीकडील (अजित पवार) पदाधिकारी नाशिक मध्य आणि ग्रामीण भागातील नांदगाव या मतदारसंघात उमेदवारी देण्यात यावी, या मताचे आहेत. सद्यस्थितीत नाशिक मध्य मतदारसंघ भाजपच्या तर नांदगाव शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी अजित पवार गटाला उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने मैत्रीपूर्ण लढत करावी, असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे.