विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमातील एक लाख ५५ हजार २३४ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत सोहळा गुरुवारी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठ आवारात होत आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी उपस्थित राहणार आहेत. मुक्त विद्यापीठाचे यावर्षी एक लाख ५५ हजार २३४ विद्यार्थी पदवी प्राप्त करणार आहेत.
मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला नोंदणी केलेले स्नातक उपस्थित राहून पदवी स्वीकारणार असल्याचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी म्हटले आहे. विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि सुमारे दोन हजारहून अधिक अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत विद्यापीठातर्फे राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य केले जाते. यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी पाच लाखाहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. विविध प्रकारच्या १०१ शिक्षणक्रमातील एक लाख ५५ हजार २३४ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना दिली जाणारी प्रमाणपत्रे वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावर विद्यार्थ्याचे रंगीत छायाचित्र असणार आहे. शिवाय क्यूआर कोडही प्रमाणपत्रावर असून तो स्कॅन करून प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करता येऊ शकेल. नवे प्रमाणपत्र हे पाणी अथवा अन्य द्रव पदार्थाने खराब होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. प्रमाणपत्रात आवश्यक त्या सुरक्षा मानकांचा समावेश आहे.
पदवीधारकांमध्ये ४८ बंदीजन, ११६ दृष्टीबाधित
पदवी प्रदान करण्यात येणाऱ्यांमध्ये पदविकाधारक २४५१८, पदव्युत्तर पदविकाधारक १२, पदवीधारक एक लाख १४ हजार ३२८, पदव्युत्तर पदवीधारक १६३६९, पीएच.डी धारक पाच तर एमफिलधारक दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एक लाख ६९३ पुरुष आणि ५४ हजार ५४१ स्त्रिया आहेत. ६० वर्ष वयावरील २०० विद्यार्थी आहेत. तर विविध शिक्षणक्रम पूर्ण करून पदवी मिळविणाऱ्यांमध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ४८ बंदीजनांचा समावेश आहे. त्यात अमरावती आठ, मुंबई दोन, नागपूर २७, नाशिक १० आणि कोल्हापूर विभागीय केंद्रातील एका बंदीजनाचा समावेश आहे. तसेच ११७ विद्यार्थी दृष्टीबाधित आहेत.