नाशिक: राष्ट्रवादी भवन ताब्यावरुन शरद पवार आक्रमक

कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी पवार समर्थकांना आतमध्ये प्रवेशास प्रतिबंध केला होता. तत्पुर्वी कार्यालयावर दादा आणि भुजबळ समर्थकांनी ताबा मिळविला होता.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहरातील राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या मालमत्तेवर पोलिसांच्या मदतीने ताबा घेतल्याचा संदर्भ देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगत अशा प्रकारे कुणी पक्षाची मालमत्ता हिसकावून घेणे योग्य आहे का, असा प्रश्न करीत अजित पवार आणि भुजबळ समर्थकांना फटकारले. पक्ष फुटीनंतर येथील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून अजितदादा, छगन भुजबळ समर्थक आणि शरद पवार समर्थकांमध्ये वाद उभा ठाकला. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी पवार समर्थकांना आतमध्ये प्रवेशास प्रतिबंध केला होता. तत्पुर्वी कार्यालयावर दादा आणि भुजबळ समर्थकांनी ताबा मिळविला होता. या कार्यपध्दतीवर मुंबईतील भाषणात पवार यांनी आक्षेप घेतला.

हे वाचले का?  “जेवढं गोडी गुलाबीने घ्याल तेवढं तुमच्यासाठी…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना पुन्हा इशारा

राष्ट्रवादी भवन ताब्यात घेण्यावरून मंगळवारी दोन्ही गटांमध्ये घोषणायुध्द झाले होते. पवार गटाकडून कार्यालयाचा ताबा घेतला जाणार असल्याची कुणकुण लागताच दादा समर्थक आणि समता परिषदेतील भुजबळ समर्थकांनी कार्यालयात ठाण मांडले होते. पवार समर्थक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी नगरसेवक गजानन शेलार हे कार्यकर्त्यांसह बैठक घेण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी झाली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यामुळे पोलिसांनी पवार गटाला आत प्रवेश करू दिला नाही. नेत्यांच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करीत असल्याचा आरोप पवार समर्थकांनी केला होता. शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रातील भाषणात नाशिकमधील पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याच्या कृतीला अयोग्य ठरविले.

नाशिकमध्ये काही लोकांनी गडबड केली. कार्यालय ताब्यात घेतले. राष्ट्रवादी भवन ही पक्षाची मालमत्ता आहे. तिच्यावर कुणी आम्ही राष्ट्र्रवादी, आमच्याकडे पक्षचिन्ह असे सांगत दावा करू शकते का, पोलिसांना हाताशी धरून ती मालमत्ता ताब्यात घेऊ शकते का, असे प्रश्न करीत लोकशाहीत हे योग्य नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. उद्या कोणी मी म्हणजे काँग्रेस, मी म्हणजे शिवसेना वा भाजप म्हणून असे कृत्य करू शकते का, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. काँग्रेसमध्ये असताना आपण नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. तेव्हा काँग्रेसची मालमत्ता आम्ही सोडून दिली. ती हिसकावून घेतली नाही. हा दाखला देत राष्ट्रवादी भवनचा ताबा घेणाऱ्यांना लक्ष्य केले.

हे वाचले का?  Jayakwadi Dam: जायकवाडीसाठी नाशिकमधून आतापर्यंत १७ टीएमसी पाणी, धरणांतील विसर्ग मंदावला

पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिल्याचे संपूर्ण देशाला माहिती आहे. सध्याच्या घडामोडीत हे चिन्ह आपल्याकडे राहणार असून कुणी त्याबद्दल धास्ती बाळगू नये. चिन्हावर देशाचे राजकारण ठरत नाही. आजवर आपण अनेक वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी भवन हे कार्यालय राष्ट्रवादी वेल्फेअर फाउंडेशनच्या नावे असल्याचे सांगितले जाते. त्यावर अजितदादा आणि भुजबळ समर्थकांचा कुठलाही हक्क नसल्याचा दावा शरद पवार समर्थक करीत आहेत. लवकरच कायदेशीर मार्गाने कार्यालयावर ताबा मिळविला जाईल, असे सुतोवाच त्यांनी केले.