नाशिक : राष्ट्रीय लोक न्यायालयात ११ हजारहून अधिक प्रकरणे निकाली, ७९ कोटींचे तडजोड शुल्क वसूल

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक न्यायालयात जिल्ह्यातून एकूण ११ हजार ४४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व प्रकरणांमध्ये तडजोडीअंती सुमारे ७९ कोटी ८९ लाख १२ हजार ९०८ रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. लोक न्यायालयात अनेक प्रकरणांत तडजोड करण्यात आली. एका मोटार अपघात प्रकरणात ४० लाख रुपयांची तडजोड झाली.

मोटार अपघात प्रकरणात २०२१ साली मोटार सायकल व मालमोटार यांच्यात नाशिक-दिंडोरी रस्त्यावर अपघात झाला होता. त्यात २९ वर्षीय व्यक्ती मयत झाली होती. अपघात नुकसान भरपाई प्रकरणात तडजोड होऊन मयताच्या वारसास ४० लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली. मोटार अपघात प्रकरणांमध्ये लोक न्यायालयात एकूण ९२८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील १४४ प्रकरणे निकाली निघाली. यात वेगवेगळ्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींनी व मयत झालेल्या वारसांनी जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रकरणे दाखल केली होती. यात तडजोडीनंतर एकूण नऊ कोटी ५० लाख ९३ हजार रुपयांची भरपाई होऊन पक्षकांरांनी समाधान व्यक्त केले. नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालयात एक हजार ६८७ मोटार वाहन प्रकरणांमध्ये १२१ प्रकरणे निकाली निघाली असून संबंधित वाहनचालकांना न्यायालयीन प्रकरणांपासून दिलासा मिळाला आहे.

हे वाचले का?  दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण एक लाख ९५ हजार ४५१ इतकी प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी ११ हजार १९२ प्रकरणे निकाली निघाली असून रुपये ११ कोटी ८९ लाख ९८ हजार १७८ रकमेची वसुली झाली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी दिली.

१५० कुटुंबांचे संबंध पूर्ववत

लोक न्यायालयात एकूण ७५ कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये तडजोड झाली. यामुळे सर्व प्रकरणांतील संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. या माध्यमातून १५० कुटुंबांचे संबंध पूर्ववत झाल्याने समाधान मिळाले.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

निकाली निघालेली प्रकरणे

१३८ अंतर्गत – ६१४ प्रकरणे

मोटार अपघात – १४४ प्रकरणे
कामगार विषयक – १४ प्रकरणे

कौटुंबिक वादातील प्रकरणे – ७५ प्रकरणे
फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे – ३४४ प्रकरणे

इतर – १०६० प्रकरणे