नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

नाशिक – शुक्रवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत येथील तपोवन परिसरात महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमामुळे वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तपोवन परिसरात कोणत्याही वाहनांसाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत ही बंदी राहील. याअंतर्गत लक्ष्मीनारायण मंदिर ते जनार्दन स्वामी आश्रम मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. मिरची हॉटेल सिग्नल ते गोदावरी लॉन्स या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील. वाहनचालक मारूती वेफर्समार्गे काठे गल्लीकडून नाशिकरोड आणि शहरात इतर मार्गाने जातील. सिद्धीविनायक चौकमार्गे छत्रपती संभाजीनगर रस्त्याने नांदुरनाकापुढे बिटको, नाशिकरोडकडे वाहने जातील.

हे वाचले का?  लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान

निलगिरी बागेत वाहनतळ

दरम्यान, कार्यक्रमासाठी येवला, नांदगाव, मालेगाव, निफाड, देवळा, बागलाण, चांदवड, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठकडून येणाऱ्या बसेससाठी निलगिरी बाग मैदानावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेजूरकर मंगल कार्यालयासमोर नाशिक तालुक्यातील बसेससाठी तर, मारूती वेफर्स परिसरात सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीकडून येणाऱ्या बसेससाठी वाहनतळ करण्यात आले आहे.

हे वाचले का?  अर्ध्या तासाच्या पावसात नाशिकमधील रस्ते पाण्याखाली; गटारीचे पाणी गोदापात्रात