नाशिक विभागात हिवतापावर नियंत्रण

आरोग्य विभागाच्या उपाययोजनांना यश

करोनाच्या संकटामुळे अन्य आजारावरील उपचारात काहीसे अवरोध आल्याचे चित्र असताना नाशिक विभागात हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी सातत्याने चाललेल्या प्रयत्नांची फलश्रुती रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होण्यात झाली आहे. १० वर्षांपूर्वी हिवतापाचे विभागात १० हजार ७२१ रुग्ण आढळले होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सातत्यपूर्ण काम झाल्यामुळे वर्षांगणिक रुग्णसंख्या कमी होत आहे. करोनाकाळातदेखील बाहेरगावहून आलेल्या व्यक्तींचेही रक्त नमुने तपासण्यात आले. सर्वेक्षण, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी आणि उपचार या त्रिसूत्रीमुळे विभागात सद्य:स्थितीत हिवताप रुग्णांची संख्या २५ वर आली आहे. रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होत असल्याने नाशिक विभागातून तो लवकरच हद्दपार होण्याची आरोग्य विभागाला आशा आहे.

कधीकाळी हिवतापाच्या साथीने अनेकांना प्राण गमवावे लागल्याचा इतिहास आहे. डासांपासून पसरणारा हा आजार. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर जिल्ह्य़ात त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दशकभरापासून प्रभावीपणे काम केले जात आहे. तसेच या आजाराने कोणाचा मृत्यू होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात आले. उपचारासाठी विभागात ४३१ केंद्रे स्थापित करण्यात आली. यामुळे मागील १० वर्षांत हिवतापामुळे विभागात एकही मृत्यू झाला नसल्याकडे विभागीय हिवताप कार्यालयाने लक्ष वेधले. सर्वेक्षण, उपचाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. २००८ मध्ये विभागात हिवतापाचे सहा हजार २४४ रुग्ण आढळले होते. पुढील तीन वर्षांत म्हणजे २०१० मध्ये रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला. नंतरच्या काळात मात्र हिवतापाचा आलेख कमी करण्यात यश मिळाले. २०१५ पर्यंत हिवतापाचे १३५२ रुग्ण आढळले होते. मागील वर्षी ४६ रुग्णांवर आलेली ही संख्या करोनाकाळात म्हणजे २०२० मध्ये जवळपास निम्म्याने कमी झाली आहे. चालू वर्षांत धुळे जिल्ह्य़ात आढळलेले ११ पैकी आठ रुग्ण हे बाहेरगावहून आलेले असल्याची माहिती आरोग्य सेवा (हिवताप) नाशिक विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली. नाशिक, जळगाव आणि नगर जिल्ह्य़ात रुग्णांची संख्या कमी आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्य़ांत आधिक्याने रुग्ण आढळले. याचे कारण या भागातील मजूर रोजगारासाठी शेजारील गुजरात, मध्य प्रदेश राज्यांत स्थलांतरित होण्यात आहे. बाधितांमध्ये त्यांचा मुख्यत्वे समावेश आहे. तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने संकलित करून तपासणी केली जाते. आशा, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित रक्तनमुने घेतले जातात. बाधित रुग्णांवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत मोफत उपचार केले जातात.

हे वाचले का?  नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल

त्यामुळे विभागातील हिवताप रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत आहे. बाधितांचे प्रमाण आणि मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी प्रभावीपणे प्रयत्न सुरू असून २०२५ पर्यंत विभागातून हिवताप हद्दपार होईल, असा विश्वास डॉ. गांडाळ यांनी व्यक्त केला.

धुळे, नंदुरबारमध्ये अधिक रुग्ण

कीटकजन्य आजारात हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आदींचा समावेश होतो. चालू वर्षांत विभागात हिवतापाचे गतवर्षीच्या तुलनेत जवळपास निम्म्याने कमी म्हणजे २५ रुग्ण आढळले. यामध्ये धुळे जिल्ह्य़ात सर्वाधिक ११, नंदुरबारमध्ये सात, जळगावमध्ये तीन, नाशिक महापालिका क्षेत्रात एक, नगर जिल्ह्य़ात ग्रामीणमध्ये दोन तर महापालिका क्षेत्रात एक यांचा समावेश आहे. चिकनगुनियाचे १६४ नमुने तपासण्यात आले. त्यातील ५८ सकारात्मक आढळले. डेंग्यूच्या निदानासाठी २३३४ संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील ४०३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या दोन्ही आजाराने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे डॉ. पी. डी. गांडाळ यांनी सांगितले.