नाशिक शहरात माफक दरात शाडू मूर्ती उपलब्ध करण्याची तयारी; महापालिका विभागीय कार्यालयात मूर्तीकारांना मोफत जागा

तसेच मनपाच्या सहा विभागीय कार्यालयात शाडू मातीच्या मूर्तींचे दालन उभारले जातील.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर रोखण्यासाठी महापालिकेकडून शाडू मातीपासून मूर्ती निर्मितीसाठी प्रत्येक विभागीय कार्यालयात मूर्तीकारांना मोफत जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच मनपाच्या सहा विभागीय कार्यालयात शाडू मातीच्या मूर्तींचे दालन उभारले जातील. या ठिकाणी गणेश भक्तांना माफक दरात मूर्ती उपलब्ध करण्यात येणार आहेत.

यंदाही पर्यावरणस्नेही पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंगळवारी प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकारांना प्रत्येक विभागीय कार्यालयात जागा मोफत दिली जाईल. तसेच प्रत्येक विभागीय कार्यालयात शाडू मातीच्या मूर्तींचे दालन उभारले जातील. या मूर्ती माफक दरांत नागरिकांना उपलब्ध केल्या जाणार असल्याचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी सांगितले. गणेशोत्सवात नागरिकांनी नदीपात्रात निर्माल्य टाकू नये. तसे आढळल्यास दंडात्मक कारवाईची सूचना बैठकीत देण्यात आली.

हे वाचले का?  इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता

उच्च न्यायालयाचे निर्देश व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. करंजकर यांनी केले. शहरातील गोदावरीसह इतर चार उपनद्यांमध्ये प्रदूषण निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. मूर्ती विसर्जनासाठी शहरासह उपनगरांमध्ये कृत्रिम तलाव उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

गत वर्षी २००९ ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे दालन उभारण्यात आले होते. विक्रेत्यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. गणेश मूर्तीसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. गणेशमूर्ती विक्री करणाऱ्यांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. शाडूच्या गणेश मूर्तींचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी पर्यावरणस्नेही आरास स्पर्धा आयोजित केल्या जातील. उत्कृष्ट मंडळांना शासनाकडून पारितोषिक दिले जाणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देश आयुक्तांनी बांधकाम विभागाला दिले. घनकचरा विभागाने सर्वत्र नियमित स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे डॉ. करंजकर यांनी सूचित केले.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका