नाशिक : शिक्षक मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात, राष्ट्रवादीच्या उमेदवारीने महायुतीत बिघाडी

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून १५ उमेदवारांनी माघार घेतली असून आता रिंगणात २१ उमेदवार आहेत.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून १५ उमेदवारांनी माघार घेतली असून आता रिंगणात २१ उमेदवार आहेत. काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीसमोरील बंडखोरीचे संकट टळले. परंतु, भाजपशी संबंधित एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीला बंडखोरीचा तोंड द्यावे लागणार आहे.

बुधवारी माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंडखोरी आणि नामसाधर्म्य असणाऱ्यांची उमेदवारी हे प्रमुख राजकीय पक्षांसमोर आव्हान ठरले. अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांच्या माघारीसाठी त्यांचे बंधू महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्न केले. काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांच्या माघारीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विनंती केली. भाजपचे धनराज विसपुते यांनी रिंगणातून माघार घेतली असली तरी भाजपशी संबंधित विवेक कोल्हे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. राज्यात सत्ताधारी असणाऱ्या महायुतीत या निवडणुकीत फूट पडली. शिवसेना (शिंदे गट) जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार उभा केला आहे.

हे वाचले का?  संविधान वाचविण्यासाठी राज्यभर सभांव्दारे प्रबोधन – श्याम मानव यांची मोहीम

माघारीनंतर एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भावसार यांच्यासह धोंडीबा भागवत, अनिल तेजा, अमृतराव उर्फ अण्णासाहेब शिंदे, इरफान इसहाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागरदादा कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरुळे, सचिन झगडे, डॉ. छगन पानसरे, रणजित बोठे, महेश शिरुडे, रतन चावला, आर. डी. निकम संदीप गुळवे (पाटील) यांचा समावेश आहे.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

निवडणुकीतून संदीप गुळवे, शेख मुख्तार अहमद, रुपेश दराडे, कुंडलिक जायभावे, दत्तात्रय पानसरे, रखमाजी भड, सुनील पंडित, बाबासाहेब गांगर्डे, अविनाश माळी, निशांत रंधे, दिलीप पाटील, डॉ. राजेंद्र विखे-पाटील, धनराज विसपुते आणि प्रा. तानाजी भामरे या १५ जणांनी माघार घेतल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.

ठाकरे गटासमोर नामसाधर्म्याची डोकेदुखी

निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या एकाने तर ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या तिघांनी अर्ज दाखल केले होते.आदल्या दिवशी शिंदे गटाचे दराडे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या नगर जिल्ह्यातील उमेदवाराने तर ठाकरे गटाचे उमेदवार गुळवे यांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या संगमनेर येथील एकाने माघार घेतली. पण, ठाकरे गटासमोरील हे संकट दूर झालेले नाही. कारण संदीप गुळवे यांच्या नावासारखे धुळे येथील संदीप गुळवे (पाटील) आणि नगर येथील संदीप गुरुळे हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.

हे वाचले का?  मोदी यांच्या सभेस चार उमेदवार अनुपस्थित; देवळालीतील सरोज अहिरे व्यासपीठावर, शिंदे गटाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह