आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षात शालेय प्रवेशासाठी बुधवारी सकाळी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे आभासी पध्दतीने सोडत काढण्यात आली असली तरी त्यासंदर्भातील माहिती पालकांपर्यंत पोहचण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे. हेही वाचा >>> जळगाव […]
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षात शालेय प्रवेशासाठी बुधवारी सकाळी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे आभासी पध्दतीने सोडत काढण्यात आली असली तरी त्यासंदर्भातील माहिती पालकांपर्यंत पोहचण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यातील ४०१ शाळा या प्रक्रियेत सहभागी झाल्या असून पाच हजाराहून अधिक जागा विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातून १६ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिल्या सोडतीत आपल्या पाल्याचा नंबर लागतो की नाही, याविषयी पालकांना उत्सुकता असतांना प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने अनेकांना प्रवेशापासून मुकावे लागेल असे चित्र आहे. बुधवारी आभासी पध्दतीने पुणे येथे सोडत काढण्यात आली. मात्र राज्यस्तरावरून एकाच वेळी ही सोडत जाहीर होत असल्याने काही तांत्रिक बाबींची पूर्तता होत असल्याने पालकाना पोर्टलवर याची माहिती मिळाली नाही. यामुळे पालकांमध्ये दिवसभर चलबिचल राहिली.
याबाबत काहींनी शिक्षण विभागाकडे दुरध्वनीवरून संपर्क केला. काही जणांनी प्रत्यक्ष कार्यालयात जावून आपल्या पाल्याचा क्रमांक लागला की नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.वास्तविक आभासी पध्दतीने राज्यस्तरावर सोडत जाहीर होत असतांना पोर्टलवर जिल्हानिहाय ही माहिती संकलन, यादी अद्यावत होण्याचे काम सुरू राहते. यामुळे पालकांपर्यंत या याद्या दोन दिवसांनी पोहचतात. बुधवारी यादी जाहीर असल्याचे समजताच पालकांनी सकाळ पासून सायबर कॅफे, भ्रमणध्वनीवर आपल्या पाल्याचा क्रमांक लागला की नाही हे पाहण्यास सुरुवात केली होती. अपेक्षित माहिती समोर येत नसल्याने अनेकांमध्ये अस्वस्थता पसरली. दोन दिवसांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रवेशाविषयी वेळापत्रक जाहीर होणार आहे. पालकांनी भ्रमणध्वनीवरील लघु संदेशावर अवलंबून न राहता पोर्टलवर याविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.