“निवडणुकीत पराभवाच्या भीतीने कंत्राटी नोकरभरतीचा जीआर रद्द”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका, म्हणाले…

निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याची नामुष्की आली, असे नाना पटोले म्हणाले.

नागपूर : निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याची नामुष्की आली. पण ते करतानाही हे पाप मागच्या सरकारचे असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फोडले, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नुसत्या प्रसिद्धीसाठी २०० कोटी मंजूर, काँग्रेसची आगपाखड; म्हणे, “ढोल पिटण्यासाठी…”!

पटोले म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय काँग्रेस सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत, पण ही नोकर भरती सरकारच करत होते व त्यांना नंतर सेवेत कायम केले जात होते. सध्याची नोकरी भरती मात्र खाजगी कंपनीकडून केली जात होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होते, मग त्यांनी काँग्रेस सरकारचा कंत्राटी नोकर भरतीचा जीआर त्याचवेळी रद्द का केला नाही?