पंतप्रधानांचा नाशिक दौरा, नाशिककरांमध्ये उत्साहही आणि गैरसोयींमुळे नाराजीही

विशेषत: वाहतूक मार्गातील बदलांमुळे पंतप्रधान मोदी शहरातून जाईपर्यंत वाहनधारकांना अडचणींना तोंड द्यावे लागले.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो, रामकुंडावर पूजन, काळाराम मंदिरात दर्शन, असे सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला असताना या कार्यक्रमांचा नागरिकांना त्रासही सहन करावा लागला. विशेषत: वाहतूक मार्गातील बदलांमुळे पंतप्रधान मोदी शहरातून जाईपर्यंत वाहनधारकांना अडचणींना तोंड द्यावे लागले.

पंचवटीतील तपोवन मैदानात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवासाठी पंतप्रधानांसह केंद्रीय तसेच राज्यातील मंत्र्यांची मांदियाळी पाहता वाहतुकीला अडथळा येऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म् नियोजनावर भर देण्यात आला होता. पंतप्रधान मोदी हे ज्या ठिकाणी जाणार होते, त्या परिसरातील कार्यक्रम स्थळाकडे जाणारे सर्व रस्ते पहाटेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. स्थानिकांना याविषयी पूर्वकल्पना असली तरी दैनंदिन कामात यामुळे अडचणी आल्या. रामकुंड परिसरात होणाऱ्या गोदाआरती, गोदापूजनसाठी २०० मीटरचा परिसर इतरांसाठी मज्जाव क्षेत्र झाला. गोदाकाठच्या नागरिकांनी दैनंदिन कामासाठी घराच्या मागील दरवाज्याचा वापर केला. काहींनी प्रशासनाच्या वतीने लादण्यात आलेले निर्बंध पाहता मुलांना शाळेत न पाठवता घरी ठेवणे पसंत केले.

हे वाचले का?  नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

दुसरीकडे, मोदींची एक छबी पाहण्यासाठी गौरी पटांगणापुढील भाग, अहिल्याबाई होळकर पूल, यशवंतराव मामलेदार पटांगणापुढील भाग, याप्रमाणे परिसरात मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. उन्हाची पर्वा न करता इमारतींच्या छतावर, मंदिराच्या कळसा नजीक, मंदिराच्या आवारात अनेक जण उभे होते. काहींनी मोदींच्या हस्ते गोदापूजन होत असताना जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष केला. काहींनी शंखनाद केला. मोदींची छबी भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. काहींनी पोलिसांनी आखून दिलेली सीमारेषा उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्याने लाठीचा प्रसाद खावा लागला. रामकुंड परिसरातील नागरिकांना दोन तासांहून अधिक काळ पोलिसांनी जणूकाही घरातच स्थानबध्द केल्याने त्यांच्यातही चलबिचल सुरू झाली. काहींनी घराबाहेर बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यावर अनेकांचे पोलिसांशी वाद झाले. एकिकडे, हा गोंधळ सुरू असताना, दुसरीकडे गोदापूजनाचा कार्यक्रम शांततेत सुरु होता.

हे वाचले का?  Lateral entry ad cancel: वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट भरती अखेर UPSC कडून रद्द; विरोधकांच्या दबावानंतर केंद्र सरकारचे घुमजाव

जोडरस्त्यांवर वाहनांची गर्दी

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर, शहरातील वाहतूक मार्गात बदल करुन वाहतूक जोड रस्त्यांकडे वळवण्यात आल्याने तारवाला नगर, दिंडोरी रोड, इंदिरा नगर यासह अन्य भागात जाणाऱ्या जोड रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडला. या रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली.

पोलिसांना निवांतपणाचे काही क्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी वेगवेगळ्या आस्थापनांनी अहोरात्र काम केले. पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेमुळे अधिक ताण आला. दौऱ्यात कुठेही गडबड होऊ नये, यासाठी पोलिसांनी ४८ तासांहून अधिक काळ कार्यक्रमाची सुत्रे हाती घेत नियोजन केले. त्या नियोजनाची अंमलबजावणी होत असतांना गोदाकाठावर असलेल्या पोलिसांनी गोदापूजन कार्यक्रमापूर्वी काही काळ निवांतपणा अनुभवला. कामावर असलेल्या पोलिसांना जागेवरच जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली होती. काहींनी जेवण आटोपताच गोदाकाठावरील मंदिराच्या सावलीचा आधार घेत वाचन, भ्रमणध्वनीवर चित्रफित पाहणे, बाहेरगावहून आलेल्या समविचारी मित्रांशी गप्पा मारणे, गोदापात्रात पाय बुडवून बसणे, असे करुन ताण हलका केला.