पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर

महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, मोदींनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. मुंबईत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यावेळी नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला.

“स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे. जेणेकरुन तरुणांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित, आदिवासी, महिलांना समान स्वरुपात उपलब्ध होत आहे,” अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

हे वाचले का?  Badlapur School Crime Case Live Updates: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!

“गेल्या आठ वर्षात ८ कोटी महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत आहेत,” असं मोदींनी सांगितलं.

“आज देशभरात पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात २ लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरु आहे किंवा सुरु होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे,” अशी माहिती मोदींनी दिली.

हे वाचले का?  कराड: पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी लवकरच राज्यातील पहिले ‘सौरग्राम’, ‘माझी वसुंधरा’च्या बक्षिसातून गावाला सौरऊर्जेची झळाळी

“केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना त्यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. भविष्यात महाराष्ट्रात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.