“पंतप्रधान मोदी २१ व्या शतकातील राजे”, राहुल गांधींचा दावा; म्हणाले, “काँग्रेसच्या चुका…”

लखनौ येथील एका कार्यक्रमात बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपाला १८० जागा मिळणार असून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत.

लोकसभा निवडणूक सुरू असताना देशातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. नुकतीच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आरक्षण, संविधान आणि हुकूमशाही यावरून टीका केली. “पंतप्रधान मोदी हे २१ व्या शतकातील राजे आहेत. त्यांना मंत्रिमंडळ, संसद किंवा संविधानाशी काहीही देणंघेणं नाही”, अशी उपरोधिक टीका राहुल गांधी यांनी लखनौ येथील एका कार्यक्रमात केली.

हे वाचले का?  Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?

काँग्रेसने केलेल्या चुका सुधारणार

लखनौमध्ये समृद्ध भारत फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या ‘संविधान संमेलन’ या कार्यक्रमात बोलत असताना राहुल गांधी यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी राहुल गांधी असेही म्हणाले की, काँग्रेसने मागच्या काही काळात अनेक चुका केल्या आहेत. भविष्यात काँग्रेसचे राजकारण बदलले दिसेल. मी काँग्रेसचा सदस्य या नात्याने हे सांगत आहे. मात्र राहुल गांधी यांनी याबाबत विस्तृत भाष्य केले नाही.

हे वाचले का?  Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!

लोकसभा निवडणुकीबाबत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले की, या निवडणुकीत भाजपा पक्ष १८० जागांच्या पुढे जाणार नाही. मी हे लेखी देऊ शकतो की, नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होत नाहीत. तसेच माझ्यासाठी सत्ता महत्त्वाची नाही. सत्तेतून फक्त लोकांची सेवा केली जाऊ शकते, त्यामुळे पक्षाकडे सत्ता असणे महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले.

‘मोदी राजे आहेत’

पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “मोदी हे पंतप्रधान नाहीत, तर राजे आहेत. मंत्रिमंडळ, संसद आणि संविधानाशी त्यांना काही देणंघेणं नाही. २१ व्या शतकातील ते राजे आहेत. देशातील दोन किंवा तीन उद्योगपतींकडे खरी शक्ती आहे.”

हे वाचले का?  Fraud Supreme Court : बनावट सर्वोच्च न्यायालय, बोगस सरन्यायाधीश अन् खोटा निकाल… सायबर ठगांचा व्यावसायिकाला सात कोटींचा गंडा