विभागीय पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्याची प्रारूप मतदार यादी बुधवारी जाहीर झाली असून त्यात एक लाख ५५ हजार ३२० मतदारांचा समावेश आहे.
प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्यामुळे मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात सुरूवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. नंतर नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था केली गेली. पहिल्या टप्प्यात मतदार नोंदणीची मुदत सात नोव्हेंबरला संपुष्टात आली होती. या काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने जमा झालेल्या अर्जांची जिल्हानिहाय पडताळणी झाली. या प्रक्रियेत कागदपत्रांची अपूर्णता आणि अन्य कारणांनी हजारो अर्ज अपात्र ठरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बुधवारी नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्याचे उपायुक्त रमेश काळे यांनी सांगितले. मतदार संघातील जिल्हानिहाय आकडेवारी पाहिल्यास नगरमध्ये सर्वाधिक नोंदणी झाली असून धुळे जिल्ह्यात हे प्रमाण कमी आहे. नोंदणीत नाशिक द्वितीय स्थानी तर जळगाव तृतीय व नंदुरबार जिल्ह्या चौथ्या क्रमांकावर आहे.
नाशिकचा विचार करता सुरगाणा ९१३, कळवण १२१२, देवळा १३५४, बागलाण २६१७, मालेगाव २५४७, नांदगाव १३९९, येवला १४८७, चांदवड १०१८, निफाड २९५१, दिंडोरी २५४०, पेठ ५८४, नाशिक ५६३२, त्र्यंबकेश्वर ४७२, इगतपुरी १५६२, सिन्नर ३७७८ मतदारांचा समावेश आहे. प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर नाव, पदवी प्रमाणपत्र किंवा दुबार नावाबाबत काही हरकती असतील तर नऊ डिसेंबरपर्यंत त्या दाखल करता येतील. दरम्यान, मागील निवडणुकीत मतदारसंघात अडीच लाखहून अधिक मतदार होते. दुसऱ्या टप्प्याची मतदार नोंदणी सुरू झाली आहे. त्यातही राहिलेल्या पदवीधरांना नोंदणी करता येणार आहे.
ल्हानिहाय मतदारसंख्या
नाशिक – ३० हजार ६६
अहमदनगर – ६९ हजार ८३४
धुळे – १४ हजार ६३२
जळगाव – २४ हजार २११
नंदुरबार – १६ हजार ५५७