पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘विघ्नहर्ता उपक्रम’

आगामी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने उत्सव काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिके ने मिशन विघ्नहर्ता उपक्र म हाती घेतला आहे.

विसर्जनासाठी महापालिकेतर्फे विभागनिहाय फिरते कृत्रिम तलाव

नाशिक : आगामी गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने उत्सव काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिके ने मिशन विघ्नहर्ता उपक्र म हाती घेतला आहे. त्यात शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जनजागृतीसह पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशाच्या विसर्जनासाठी विभागनिहाय फिरत्या कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव २०२१ अनुषंगाने नियोजनविषयक सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत करोनाचा संसर्ग लक्षात घेता पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काही सूचना करण्यात आल्या.  गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्याच्या दृष्टीने शाडू मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने घरीच पाण्यात अमोनिअम बायकाबरेनेट पावडर टाकून त्यामध्ये श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांना अमोनिअम बायकाबरेनेट पावडर उपलब्ध करून देणे, त्याकरिता नाशिक महानगरपालिकेमार्फत मूर्ती विक्रीच्या ठिकाणी पावडर वाटपाचे दालन उभारणे, मार्गदर्शक सूचना फलक लावणे आणि मूर्तीच्या वजनाविषयी संबंधित विक्रेत्यांनी उल्लेख करण्याविषयी सूचना देणे असे निर्णय घेण्यात आले.

हे वाचले का?  नाशिक : प्रलंबित मागण्यांसाठी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग राहण्यासाठी काही गोष्टींवर विशेष भर देण्यात येणार आहे. शाडू मातीची मूर्ती तयार करणे, पर्यावरणपूरक आरास करणे आणि मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करणे, याकडे लक्ष देण्यात येणार आहे. मूर्ती विसर्जनाकरिता ऑनलाइन वेळ नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महापालिके च्या संकेतस्थळावर नोंदणी करत मूर्ती विसर्जनाकरिता ऑनलाइन वेळेची नोंदणी करणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. ऑनलाइन वेळ नोंदणीनुसार मूर्ती विसर्जन करणाऱ्यांना क्युआर कोड कार्यान्वित झाल्यानंतर महानगरपालिकेमार्फत ई प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

पर्यावरण संवर्धन आणि करोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करण्यासाठी फिरता कृत्रिम विसर्जन तलाव हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ५० किंवा त्यापेक्षा जास्त सदनिका असलेल्या इमारती, सोसायटी, कॉलनीच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे सहा विभागांसाठी एकूण सहा फिरते कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांची रस्त्यावर अथवा नदीवर विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही.

महानगरपालिका क्षेत्रात कृत्रिम तलावांसह विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात येऊन त्या ठिकाणी मूर्ती तसेच निर्माल्य संकलनाकरीता व्यवस्था करण्यात येईल. तसेच, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आणि नदीपात्र प्रदूषित होऊ नये याकरिता मूर्ती दान करणे आणि निर्माल्य संकलित करणे याविषयी जनजागृतीसाठी विसर्जनांच्या ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. यासाठी विविध स्वयंसेवी, शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांचे सहकार्य महापालिका घेणार आहे. महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना नागरिकांनी प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

हे वाचले का?  पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग