करोना काळातही स्वस्त धान्य वितरणात गैरप्रकाराचे सत्र कायम असल्याचे उघड झाले आहे.
नाशिक : करोना काळातही स्वस्त धान्य वितरणात गैरप्रकाराचे सत्र कायम असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुरवठा विभागाने शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई केली. काही दुकानांनी निर्बंधात म्हणजे दुपारनंतर धान्य वितरणाची किमया साधली तर काही दुकाने शटर खाली करून रात्रीही सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
करोनाच्या संकटात गोरगरीबांना शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा मोठा आधार आहे. शिधापत्रिकांना तो मिळणे आवश्यक आहे. त्याच्या वाटपात गैरप्रकार होत असल्याची बाब धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या तपासणीत निष्पन्न झाली.
राज्यात १५ जूनपर्यंत टाळेबंदी वाढविली गेली. या निर्बंधाची सर्वाधिक झळ गरीबांना बसली. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य शासन, केंद्र शासनाने एप्रिल आणि मे महिन्यात आणि केंद्र शासनाच्या गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत धान्य वितरण केले जात आहे. करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन यंत्रावर धान्य वितरणाची सुविधा देण्यात आली. यामध्ये घोळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुरवठा विभागाने शहरातील काही दुकानांची छाननी केली. त्यात गंभीर त्रुटी आढळल्या.
त्याआधारे सिडकोतील तीन तर शहरातील अन्य दोन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. काही दुकानदारांच्या ई पॉस यंत्रावर दुपारनंतर धान्य वितरण झाल्याची नोंद आढळून आली. तर काही दुकाने सायंकाळी देखील शटर बंद करून सुरू असल्याचे तपासणीत आढळले. दुकानदारांचा अंगठा ग्रा धरला जात असल्याने पात्र शिधापत्रिकाधारकांना पावतीप्रमाणे धान्य उपलब्ध करून देणे अपेक्षित असतांना अनेकांना धान्याचा पुरेसा पुरवठा करण्यात आला नसल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या.