नाशिक जिल्ह्य़ात आदिवासी भागातील तहानलेल्या गावांची स्थिती
नाशिक जिल्ह्य़ात आदिवासी भागातील तहानलेल्या गावांची स्थिती
चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता
नाशिक : कामाच्या शोधात निम्म्याहून अधिक युवक शहरात निघून गेल्यामुळे आदिवासी गावे, पाडय़ांमध्ये सध्या केवळ चिमुरडे, महिला आणि ज्येष्ठांचे अधिक वास्तव्य आहे. उन्हाची तीव्रता जशी वाढली, तसे पाणीटंचाईचे संकट नेहमीप्रमाणे निर्माण झाले आहे. कुठे डोंगर-दऱ्यात खोलवर उतरून तर कुठे दोन, तीन किलोमीटरहून पाणी आणण्याची कसरत सुरू होण्याच्या मार्गावर आहे. शहरात गेलेल्या किं वा तालुक्याला जाऊन मोलमजुरी करणाऱ्यांच्या अर्थार्जनातून कसाबसा चरितार्थ चालविणाऱ्या आदिवासी कुटुंबांना पाण्यासाठी अपार कष्टाबरोबर आर्थिक तोशीषदेखील सहन करावी लागत आहे.
मुसळधार पाऊस कोसळणाऱ्या नाशिक जिल्ह्य़ातील त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक गाव, पाडय़ांमध्ये हे चित्र आहे. बहुतांश ठिकाणी विहिरी तळ गाठू लागल्याने पुढील संकटाची चिंता ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दाटली आहे. ५०० लोकसंख्येची भागओहोळ ग्रामपंचायत. मागणी केली गेली असली तरी टँकर कधी सुरू होईल, हे गावात कुणाला सांगता येत नाही. टँकर सुरू झाल्यास एक-दोन दिवसाआड पाणी मिळते. तेही पुरेसे नसते. गावालगतच्या शासकीय विहिरीने तळ गाठला आहे. ती आटली की दरीत दुसरी विहीर आहे. तिथून पाणी आणायचे. तिच्यावर काही दिवस निघून जातात. मग डोंगर, दऱ्या उतरून तीन, चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. महिलांसह घरातील पुरुष, लहानगे सर्वाना पाणी आणणे हेच एकमेव महत्त्वाचे काम ठरते. ज्यांच्या घरी दुचाकी आहे, त्यांनी गाडीवर दोन खेपा आणता येईल, अशी व्यवस्था केलेली आहे. परवडत नसले तरी इंधन भरून पंचक्रोशीत जिथे सहज पाणी मिळेल, तिथून ते वाहनावर आणले जाते. गावात पाणीपुरवठा योजनेसाठी काही निधी मंजूर झाल्याचे सरपंच अशोक लहारे सांगतात. परंतु पाण्याचा स्रोत नसल्याने ते काम झाले नाही. पाण्याचा नैसर्गिक स्रोत शोधण्यासाठी शेकडो फूट खोलवर कूपनलिका खोदावी लागेल. निधी आणि खर्चाची सांगड बसत नसल्याने तो विषय बारगळला.
पाणीटंचाईच्या भीषण संकटात लग्न-कार्यातील उत्साह मात्र कमी झालेला नाही. खासगी टँकरने पाणी मागवून लग्न धडाक्यात पार पडतात. वधुपित्याला वऱ्हाडींची संख्या लक्षात घेऊन टँकर मागवावे लागतात. हजार लिटरच्या टँकरसाठी १२०० रुपये खर्च येतो. कुडाच्या घरात राहणाऱ्यांना पाण्यासाठी उन्हाळ्यात पैसे खर्च करावे लागतात. शासकीय टँकरमधून दोन, तीन हंडे मिळतात. घरगुती वापरासाठी कुणाला स्वतंत्र टँकर मागविणे झेपत नाही. त्यामुळे पाच-सात कुटुंब मिळून पैसे जमवतात. टँकरचे पाणी आपसात वाटून घेतात. एका कुटुंबास महिन्याला दीड ते दोन हजार रुपये पाण्यासाठी खर्च येतो. ज्यांची ती क्षमता नाही, त्यांची भटकंती ठरलेली. निमसाबाई लहारे सांगत होत्या. हंडाभर पाण्यासाठी डोंगर-दऱ्यात चढ-उतार करावी लागते. कधी कधी रात्रभर विहिरीजवळ बसून आपला क्रमांक कधी येईल, याची वाट पाहावी लागते. पाऊस येईपर्यंत पाणी, हंडा आणि विहीर यामध्ये बाई-माणूस जाम होऊन जातात. आमच्या तीन पिढय़ा हे करण्यातच खपल्या. आता आम्ही खपतो. हे भोग कधी सरणार हे सांगता येत नसल्याची हतबलता महिला व्यक्त करतात.
पावसाच्या पाण्यावर भात, नागली, वरई अशी पिके घेतली जातात. ते घरात पुरत नाही. बाजारात विकून पैसे मिळतील इतके उत्पादनच नसते. पावसाळ्यातील शेतीचा हंगाम संपला की, रोजगारार्थ स्थलांतर सुरू होते. गावातील जवळपास निम्मे लोक बागायती भागात मोलमजुरी वा तत्सम कामांसाठी निघून जातात. त्यातून स्वत:सह गावाकडील कुटुंबाचा गाडा हाकला जातो. हाताला काम मिळाल्यास दिवसाकाठी २०० ते ३०० रुपये मजुरी मिळते. महिनाभर सलग काम मिळेल, याची शाश्वती नसते. अनेक दिवस कामाविना जातात. या स्थितीतून मार्गक्रमण करताना गावात थांबलेल्या कुटुंबांना पाण्यासाठी डोंगर-दऱ्यात भटकंती करावी लागते. शिवाय आर्थिक झळही सहन करावी लागते, याकडे सरपंच लहारे लक्ष वेधतात.
४० हून अधिक गावांत धग
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ४०हून अधिक गाव-पाडय़ांना दरवर्षी पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो. हरसूल तसेच त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या मुठवड, वळणगाव, घोटबारी, शेवगापाडा, खडकओहळ, गावठा, मुरंबी आणि भागओहोळ आदी गावात बिकट स्थिती आहे. हंडाभर पाण्यासाठी डोंगर चढ-उतार करत पिण्यासह दैनंदिन वापरासाठी पाणी मिळवावे लागते. घरात दोन, तीन बायका असतील तर कामाची विभागणी होते. पण एकच स्त्री असेल तर घरातील कामे आणि विहिरीवरून पाणी आणणे अशी दुहेरी कसरत या महिलांना करावी लागते. या महिलांना पंतप्रधान उज्वला योजनेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे. गावात नळाला नसले तरी विहिरीत पाणी आणा एवढीच त्यांची अपेक्षा आहे.