पुणे: खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

उत्सवानिमित्त खंडोबा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

जेजुरीच्या खंडोबा गडावर वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंहभारती यांच्या हस्ते घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.

सकाळी अकरा वाजता घटस्थापनेसाठी मुख्य मंदिरातील उत्सवमूर्ती पाकाळणी, पूजा-अभिषेक झाल्यानंतर सनई-चौघड्याच्या वाद्यांमध्ये नवरात्र महालात आणण्यात आल्या. या वेळी सदानंदाचा येळकोट असा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. नवरात्र महालात धार्मिक वातावरणात खंडोबा-म्हाळसा देवीच्या मूर्तीची घटस्थापना करण्यात आली. या वेळी वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी व प्रसाद खाडे यांनी पौरोहित्य केले. पुजारी गणेश आगलावे, चेतन सातभाई, बाळकृष्ण दिडभाई, मल्हार बारभाई, अनिल आगलावे, बापू सातभाई, अतुल मोरे, हनुमंत लांघी, सतीश कदम, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त राजकुमार लोढा, पंकज निकुडे-पाटील, संदीप जगताप, शिवराज झगडे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, अधिकारी संतोष खोमणे, गणेश डीखळे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान यांच्यावतीने सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त खंडोबा मंदिराला पुजारी, सेवेकरी वर्ग व पुणे येथील खंडोबा भक्त शेळके यांच्यावतीने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. ऎतिहासिक गडाला नेत्रदीपक विद्युत रोषणाई केल्याने सारा गड उजळला आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत हा उत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्रात घरोघरी चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबाचे घट बसविण्यात आले. गुरुवारी सकाळपासून खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

हे वाचले का?  पाऊले चालती तुळजापूरची वाट…; कोजागरीनिमित्त शेकडो भाविकांनी रस्ते फुलले