शहरी विकास मंत्रालयाचा निर्देशांक जाहीर
महापालिकांच्या कामगिरीत पिंपरी-चिंचवड चौथे, शहरी विकास मंत्रालयाचा निर्देशांक जाहीर
देशात मोठय़ा शहरांमध्ये बेंगळूरु आणि छोटय़ा शहरांमध्ये सिमला ही शहरे वास्तव्यासाठी सर्वात योग्य असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने दिला आहे. १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वास्तव्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेले पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर असून श्रीनगर अखेरच्या ४९ क्रमांकावर आहे.
जीवनसुलभता आणि महापालिकांची कामगिरी दर्शवणारा यंदाचा निर्देशांक गुरुवारी जाहीर करण्यात असून त्यामध्ये पहिल्या ५० शहरांमध्ये महाराष्ट्रातील ११ शहरांचा समावेश आहे. यासंदर्भात झालेल्या सर्वेक्षणात जीवनसुलभतेच्या दृष्टीने त्या-त्या शहरांतील वास्तव्याची सुविधा, शिक्षण, आरोग्य, दैनंदिन व्यवस्था, अर्थव्यवस्था, सुरक्षितता आदी १३ निकष तपासण्यात आले. त्याआधारावर देशात वास्तव्यासाठी सर्वाधिक योग्य शहर कोणते हे ठरवण्यात आले. या सर्वेक्षणात १० लाखांपेक्षा व १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांची स्वतंत्र वर्गवारी करण्यात आली. सर्वेक्षणात १११ शहरांचा समावेश होता. त्याचप्रमाणे, या सर्व शहरांतील स्थानिक प्रशासनाची (महापालिका वा नगरपालिका) कामगिरी तपासण्यात आली. १० लाखांपेक्षा लोकसंख्या असलेल्या महापालिकांमध्ये इंदूरचे स्थान अव्वल राहिले असून पिंपरी-चिंचवड महापालिका चौथ्या क्रमांकावर राहिली. १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या स्थानिक प्रशासनामध्ये नवी दिल्ली नगर परिषद पहिल्या क्रमांकावर राहिली.
देशातील १० जीवनसुलभ शहरे
* १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या – बेंगळूरु, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सुरत, नवी मुंबई, कोयंबतूर, बडोदा, इंदूर आणि बृहन्मुंबई.
* १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या- सिमला, भुवनेश्वर, सिल्वासा, काकीनाडा, सेलम, वेल्लोर, गांधीनगर, गुरुग्राम, दावणगिरी, तिरुचिरापल्ली.
महाराष्ट्रातील जीवनसुलभ शहरे व क्रमांक
’१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या – पुणे (२), नवी मुंबई (६), बृहन्मुंबई (१०), ठाणे (११), कल्याण-डोंबिवली (१२), पिंपरी-चिंचवड (१६), सोलापूर (१७), नागपूर (२५), औरंगाबाद (३४), नाशिक (३८) आणि वसई-विरार (३९)
* १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या- अमरावती (४५)
महाराष्ट्रातील महापालिका व क्रमांक
* १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या- पिंपरी-चिंचवड (४), पुणे (५), बृहन्मुंबई (८), नवी मुंबई (११), ठाणे (२५), कल्याण-डोंबिवली (२६), नागपूर (३०), नाशिक (३२), वसई-विरार (४१), सोलापूर (४५) आणि औरंगाबाद (४७)
* १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या – अमरावती (२७)
देशातील १० सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिका-नगरपालिका
* १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या – इंदूर, सुरत, भोपाळ, पिंपरी-चिंचवड, पुणे, अहमदाबाद, रायपूर, बृहन्मुंबई, विशाखापट्टणम आणि बडोदा.
* १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या- दिल्ली, त्रिपुरा, गांधीनगर, करनाल, सेलम, तिरूपूर, बिलासपूर, उदयपूर, झांसी आणि तिरुनेलवेल्ली.