पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक; मुंबईकडे जाणारी वाहतूक राहणार बंद

आज (गुरुवारी) बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून, उर्वरित सैल झालेले दगड आणि माती काढण्याचं काम करण्यात येणार आहे.

देशातील महत्त्वाचा महामार्ग म्हणून पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग ओळखला जातो. याच महामार्गावर तीन दिवसांपूर्वी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल १७ तास खोळंबली होती. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर द्रुतगती मार्गावरील दरड बाजूला करून दोन लेनवरून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरळीत केली होती. दुसऱ्या दिवशी दगड आणि माती काढण्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला. आता पुन्हा आज (गुरुवारी) बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून, उर्वरित सैल झालेले दगड आणि माती काढण्याचं काम करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  कराड: पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी लवकरच राज्यातील पहिले ‘सौरग्राम’, ‘माझी वसुंधरा’च्या बक्षिसातून गावाला सौरऊर्जेची झळाळी

एक्सप्रेस वेवरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. केवळ हलक्या वाहनांसाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंग्रोबा घाटातून वाहतूक सुरू राहील, अशी माहिती बोरघाट पोलिसांनी दिली आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे सात ते आठ किलोमीटरच्या रांगा पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने लागल्या होत्या. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. मुळात दोन तासांचा असलेला ब्लॉक साडेतीन तासांवर पोहोचला तसेच कामही पूर्ण झाले नसल्याने आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येत आहे.