अवघ्या तीन वर्षांत पाणीपुरवठा योजना मार्गी
योजनेचे काम अंतिम टप्प्यात; अवघ्या तीन वर्षांत पाणीपुरवठा योजना मार्गी
नाशिक : सटाणा शहराला संजीवनी ठरणाऱ्या सुमारे ५१ कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेली पुनंद पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात असून १ मे या महाराष्ट्रदिनी शहरातील घरोघरी पुनंद धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पोहचविण्याची तयारी केली जात असल्याची माहिती सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली.
शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन नगरपालिका निवडणुकीत दिले होते. अवघ्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पुनंद पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे. योजनेच्या कामाची पाहणी करून आढावा घेतल्यानंतर मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कळवण तालुक्यातील पुनंद धरणातून सटाणा शहरासाठी थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्या अंतर्गत जलवाहिनीचे पुनदपासून १८ किलोमीटरच्या कामाची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. जानेवारी अखेपर्यंत सटाणा शहरातील पाणीपुरवठा जलवाहिनीची चाचणी करण्यात येणार आहे. पुनंद येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू आहे. सटाणावासीयांना स्वच्छ, निर्जंतूक पाणी मिळावे यासाठी आवश्यक यंत्रणा, तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. जलशुद्धीकरणासाठी आवश्यक २४ तास विजेसाठी स्वतंत्र वाहिनी घेण्यात येईल. या योजनेंतर्गत सटाणा शहरातील चौगांव बर्डी येथे दोन जलकुंभ उभारण्यात आले आहेत. तिथे संरक्षक भिंत उभारून सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात येणार आहे.
पाणीटंचाई सटाणा शहराच्या पाचवीला पुजलेली होती. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. पुनंद पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांची जाचातून मुक्तता होईल. महाराष्ट्रदिनी सटाणा शहरात थेट घरात पूर्ण क्षमतेने शुद्ध, निर्जंतूक पाणी देण्याचा मानस आहे.
– सुनील मोरे (नगराध्यक्ष, सटाणा नगरपालिका)