पुरीच्या जगन्नाथ मंदिरात गुप्त भुयार? पुरातत्त्व खात्याकडून होणार पडताळणी..

बाहेरील आणि आतील दोन्ही दालनातील दागिने तात्पुरत्या स्ट्राँगरूममध्ये हलवण्यात आले असून, मंदिर जीर्णोद्धारासाठी एएसआयकडे सोपवण्यात येणार आहे.

Secret tunnel inside Jagannath Temple? पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडार रविवारी ४६ वर्षांनंतर सरकारी अधिकाऱ्यांसमक्ष उघडला गेला, यावेळी या रत्नभांडाऱ्यात अनेक प्राचीन आणि मौल्यवान मूर्ती असल्याचे उघड झाले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या रत्नभांडाऱ्यातील पाच ते सात वस्तू पूर्वीच्या कोणत्याही यादीत सूचीबद्ध नव्हत्या. वर्षानुवर्षे बंदिस्त असल्याने या मूर्ती काळ्या पडल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले. शिवाय या रत्नभांडाराचे भारतीय पुरातत्त्व खात्याकडून लेझर स्कॅन करण्यात येणार आहे, याठिकाणी गुप्त भुयार आणि त्यात मौल्यवान दागिने असल्याची शंका व्यक्त केली गेल्याने ते स्कॅन करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्त्व खाते लेझर स्कॅनिंग करण्यासाठी अत्यंत अत्याधुनिक साधनांचा वापर करणार आहे, असे पुरी मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणाले. मंदिर प्रशासन सखोल तपासणीनंतर रत्नभांडारच्या बाहेरील आणि आतील दोन्ही दालने पुरातत्त्व खात्याकडे दुरुस्तीसाठी सुपूर्द करेल. परंतु आतील दालनाच्या आत असलेल्या कोणत्याही गुप्त भुयारासंबंधी कागदपत्र उपलब्ध नाही, तरी ते अस्तित्त्वात असल्याचा दावा केला जातो. तेच या सर्वेक्षणातून पडताळून पाहण्यात येणार आहे.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!

रत्नभांडारच्या यादीवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ११ सदस्यीय समितीचे अध्यक्ष विश्वनाथ रथ यांनी सांगितले की, गेल्या चार दशकांमध्ये आतील दालनात सापडलेल्या प्राचीन मूर्ती जवळपास तशाच पडून असल्याने काळ्या पडल्या आहेत. या मूर्ती समोर येताच समितीच्या सदस्यांनी लगेचच दीप प्रज्वलित करून मूर्तींची पूजा केली, असे रथ यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. परंतु त्यांचा असाही विश्वास आहे की, या रत्नभांडाऱ्याची सेवा करणाऱ्या पूर्वीच्या पुजाऱ्यांनी या मूर्तींची पूजा केली असावी. १८ जुलै रोजी या मूर्ती तात्पुरत्या स्ट्राँगरूममध्ये हलवण्यात आल्या. यापूर्वी रत्नभांडारात सोन्याचे मुकुट, सोन्याचे वाघाचे पंजे, सोन्याच्या माळा, सोन्याची चाके, सोन्याची फुले, सोन्याच्या मोहरा (नाणी), लॉकेट, चांदीचे सिंहासन, बांगड्या, हिऱ्यांनी सजवलेले हार, मोती इत्यादी मौल्यवान खजाना असेल अशी प्रचलित धारणा होती. परंतु समितीच्या सदस्यांनी कबूल केले की, त्यांना आतल्या दालनात कोणत्या प्रकारच्या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत याची कल्पना नव्हती. दुर्गा प्रसाद दासमोहपात्रा, हेही या ११ सदस्यीय समितीचा भाग होते. त्यांनी सांगितले की, त्यांना बाहेरच्या दालनात फक्त सोने आणि चांदीच्या वस्तू सापडल्या. हे दालन दरवर्षी वार्षिक उत्सवासाठी उघडले जाते. तर आतल्या दालनात फक्त या मौल्यवान धातूपासून तयार केलेल्या मूर्ती सापडल्या.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

विश्वनाथ रथ यांनी गुप्त भुयाराविषयी स्पष्ट केले की, “आम्ही अशा सिद्धांतांवर कधीही विश्वास ठेवला नाही. कारण तसे कोणतेही कागदोपत्री पुरावे नाहीत. आम्ही सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवून आतल्या दालनाच्या भिंतींची तपासणी केली आहे आणि आम्हाला गुप्त बोगद्याच्या अस्तित्वाची कोणतीही शक्यता आढळली नाही. दोन्ही दालनातून सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तू हलवण्यात आल्याने आता त्यांच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने त्यांचे काम पूर्ण केल्यावर मंदिराच्या आवारातील तात्पुरत्या स्ट्राँगरूममध्ये ठेवलेले दागिने परत रत्न भांडारमध्ये हलवले जातील आणि त्यानंतर यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल.”

हे वाचले का?  पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष