पुलवामात दोन दहशतवादी ठार; सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई

‘एक्स’वरून पोलिसांनी माहिती दिली की, दहशतवादविरोधी मोहिमेत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत.

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले अशी माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिली. पुलवामामधील निहामा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे घेराबंदी करून शोधमोहीम राबवली असे पोलिसांनी सांगितले.

दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही के बिरधी यांनी सांगितले. मृत दहशतवाद्यांची ओळख आणि ते कोणत्या गटासाठी कार्यरत होते याचा तपास लावला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे वाचले का?  पक्षपातावरून खडाजंगी; अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुल्लेखामुळे ‘इंडिया’ आघाडी आक्रमक

पोलिसांनी दहशतवाद्यांबद्दल अधिक काही सांगितले नसले तरी, लष्कर-ए-तय्यबाचे (एलईटी) दोन दशतवादी सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाबरोबर चकमक करत असल्याची माहिती सूत्रांनी आधी दिली होती. यापैकी एक दहशतवादी दीर्घकाळापासून सुरक्षा दलाच्या रडारवर होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ अहमद दार आणि रईस अहमद अशी त्यांची नावे असून दोघेही पुलवामाच्या काकापोरा गावचे रहिवासी आहेत. यापैकी दार सप्टेंबर २०१५पासून एलईटीबरोबर कार्यरत असून अनेक वेळा सुरक्षा दलांच्या तावडीतून निसटला आहे. तर अहमद २०२१पासून एलईटीबरोबर आहे.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

‘एक्स’वरून पोलिसांनी माहिती दिली की, दहशतवादविरोधी मोहिमेत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यांचा परिचय आणि दहशतवादी गट यांची खात्री केली जात आहे.