पूरामुळे पर्यटकांच्या गर्दीला चाप; आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत सूचना

पावसाळय़ात नद्यांना पूर आल्यावर तो बघण्यासाठी नागरिक अनेक ठिकाणी गर्दी करतात.

नाशिक: पावसाळय़ात नद्यांना पूर आल्यावर तो बघण्यासाठी नागरिक अनेक ठिकाणी गर्दी करतात. सेल्फी काढण्यासाठी धडपडतात. अशावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून गर्दीवर प्रतिबंध करण्याची सूचना जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित आढावा बैठकीत करण्यात आली. शहरी भागातील काझीगढी, सराफ बाजार, जुने आणि धोकादायक वाडे येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी नियोजन करण्याची आवश्यकता यावेळी मांडली गेली.

अपर मुख्य सचिव (गृह) तथा पालक सचिव आनंद लिमये यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क राहून जीवित व वित्तहानी होणार नाही यावर लक्ष्य केंद्रीत करावे, अशी सूचना लिमये यांनी केली.

हे वाचले का?  अजित पवार उशीरा आल्याने लाडकी बहीण मेळाव्यास अनुपस्थित

जिल्ह्यातील पुराचा इतिहास पाहता सर्व यंत्रणांनी पावसाच्या काळात आपत्ती नियंत्रणासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन केले आहे. आपत्ती काळात सर्वानी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण होते, त्या क्षेत्रात प्रारंभापासून काळजी घ्यावी. गेल्या दोन वर्षांपासून धरणातून पाणी सोडण्याचे जसे नियोजन केले जाते, तसेच यंदाही करावे. संभाव्य आपत्ती काळात शोध आणि बचाव पथक प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या नियोजनाची माहिती घ्यावी. असे पालक सचिव लिमये यांनी सूचित केले.

हे वाचले का?  नाशिक: जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल, स्काॅच ग्रुपतर्फे पुरस्काराने गौरव

बघ्यांच्या गर्दीला प्रतिबंध करण्याची सूचना

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नद्यांचा पूर पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीला प्रतिबंध करण्याची सूचना केली. पूरामुळे बाधित होणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी बचाव पथकांची गावनिहाय यादी करावी. अतिवृष्टीप्रसंगी जलसंपदा विभागाकडून धरणातून अतिरिक्त विसर्ग सोडला जातो. त्यावेळी नदीच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेण्यासाठी महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने एकत्रितपणे पाणी पातळीचे नव्याने चिन्हांकन करून घेण्यास सुचविले गेले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी जिल्हा आपत्ती प्राधिकरणांतर्गत झालेल्या नियोजनाची माहिती सादर केली. जलसंपदा विभागाच्या आपत्ती नियोजनाचे सादरीकरण अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांनी केले.