पूर्व लडाखमधील माघारीबाबत चीन-भारत चर्चा

दोघा परराष्ट्र मंर्त्यांची एससीओ शिखर बैठकीच्या निमित्ताने दुशान्बे येथे १६ सप्टेंबर रोजी  भेट झाली होती.

भारत आणि चीन यांच्यादरम्यान पूर्व लडाखमधील उर्वरित भागातील सैन्य माघारीबाबत लष्करी पातळीवरील उच्चस्तरीय चर्चेची तेरावी फेरी सुरू झाली. या भागातील  उर्वरित ठिकाणांहून चीनने  माघार  घ्यावी यासाठी भारत आग्रही असेल, असे सूत्रांनी सांगितले.

चर्चेची तेरावी फेरी ही कोअर कमांडर पातळीवर मोल्दो या चीनकडच्या बाजूला सुरू झाली आहे. सकाळी दहा वाजता चर्चेला सुरुवात झाली. परराष्ट्र मंत्री  जयशंकर यांनी चीनचे समपदस्थ वँग यी यांना लडाखच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आवाहन केले होते.  त्या पाश्र्वाभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचले का?  Harini Amarasuriya : हरिनी अमरसूर्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान; भारताशी आहे खास कनेक्शन

दोघा परराष्ट्र मंर्त्यांची एससीओ शिखर बैठकीच्या निमित्ताने दुशान्बे येथे १६ सप्टेंबर रोजी  भेट झाली होती. दोन्ही देशात ३१ जुलै रोजी बाराव्या फेरीची चर्चा झाली होती. त्यानंतर दोन्ही लष्करांनी  गोग्रा भागात माघारीची प्रक्रिया पूर्ण केली होती.  पूर्व लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही फेरी महत्त्वाची ठरली होती. रविवारच्या चर्चेत भारताचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन करीत असून ते लेहमधील १४ व्या कमांडचे प्रमुख आहेत. शनिवारी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी असे म्हटले होते की, पूर्व लडाखमध्ये चीनची तैनाती वाढली असून ती चिंतेची बाब आहे, पण चीन तैनाती करणार असेल तर आम्हीही आमची कुमक वाढवू.

हे वाचले का?  भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची पाक नेत्याबरोबर काय चर्चा झाली?

 बाराव्या फेरीच्या चर्चेनंतर चीनने गोग्रा येथून माघार घेतली होती. चीनने उत्तराखंडमधील बाराहोटी व अरुणाचलातील तवांग क्षेत्रात केलेल्या घुसखोरीच्या पाश्र्वाभूमीवर आताची चर्चा होत आहे. तवांग येथे दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. नंतर कमांडर पातळीवरील चर्चेत हा वाद मिटवण्यात आला होता. सैन्य माघारीची प्रक्रिया वेगाने घडून यावी अशी भारताची अपेक्षा असून देपसांग व डेमचोक  येथून चीनने सैन्य माघारी घ्यावे यासाठी आग्रह धरण्यात येत आहे. ३१ जुलै रोजी चर्चेच्या बाराव्या फेरीत गोग्रा  येथून सैन्य माघारीच्या मुद्द्यावर यश आले होते. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही माघार महत्त्वाची होती.