“पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार”; अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं कारण

आम्ही अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेची मदत करण्याचा प्रयत्न केल्याचंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि कमी झालेल्या पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. आत्ताच्या तुलनेत पेट्रोल डिझेलच्या किमतीत आणखी वाढ होणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सांगितलं.


इंधन दरवाढीबद्दल पुण्यात माध्यमांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले, “पेट्रोल आणखी वाढणार कारण रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढतायत, म्हणून अर्थसंकल्प सादर करताना सिलेंडर वापरणारा महिला वर्ग, सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या या सगळ्यांचा एक हजार कोटी टॅक्स माफ केला आहे. करोनानंतर अर्थसंकल्पामध्ये एक रुपयाची वाढ केली नाही. उलट त्यातून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, शेवटी विकासही झाला पाहिजे, सरकारही चाललं पाहिजे”.

हे वाचले का?  Raj Thackeray on Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, “त्या मुलींना आणि घरच्यांना…”


अमेरिका आणि सौदी अरेबियानंतर रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु असल्याने निर्यात केलेल्या कच्च्या तेलापैकी ६५ टक्के तेल आंतरराष्ट्रीय बाजारात येत नाही. त्यामुळे जगात तेलाचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेल आणि गॅसच्या किमती झपाट्याने वाढत आहेत.
२४ फेब्रुवारीपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत ७ मार्च रोजी प्रति बॅरल ९० डॉलरवरून वाढून १४० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. मात्र त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल प्रति बॅरल ११५ डॉलरच्या आसपास आहे.