पेट्रोल पंपांवरील हेल्मेट सक्तीत बंदोबस्तासाठी अडचणी

पाच वर्षांत शहरात ७८२ अपघातांत ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाती मृतांमध्ये ४६७ हे दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे उघड झाले.

अपुरा पोलीस बंदोबस्त; वाहनधारकांची अर्ज भरण्याकडे पाठ; तात्पुरत्या हेल्मेटची शक्कल

नाशिक : शहरात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेला पालकमंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिनी सुरुवात झाली असली तरी तिच्या अंमलबजावणीत पेट्रोल पंपचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शुभारंभाच्या दिवसासह दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी अनेक पंपांवर दुपापर्यंत पोलीस कर्मचारी आलेले नव्हते. परिणामी, हेल्मेटचा आग्रह धरल्यावरून काही पंपांवर कर्मचाऱ्यांशी वाहनधारकांनी वाद घातले. हेल्मेट परिधान न केलेल्या वाहनधारकांनी कारवाईच्या धास्तीने पोलिसांनी उपलब्ध केलेला अर्जदेखील भरला नाही. काही वाहनधारकांनी इतरांकडून तात्पुरते हेल्मेट घेऊन इंधन भरण्याची शक्कल लढविली.

पाच वर्षांत शहरात ७८२ अपघातांत ८२५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाती मृतांमध्ये ४६७ हे दुचाकीस्वार असून त्यापैकी ३९७ जणांनी हेल्मेट परिधान केले नसल्याचे उघड झाले. अशा अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त पाण्डय़े यांनी ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ची संकल्पना मांडली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गंगापूर रस्त्यावरील सद्भावना पोलीस पेट्रोल पंपांवर भुजबळ यांच्या हस्ते आणि देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे या आमदारांच्या तसेच पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े, मनपा आयुक्त कैलास जाधव आदींच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरिकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले. सर्व पेट्रोल पंपांवर सीसी टीव्ही कॅमेरे लावून हेल्मेट न घालणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.  पोलीस आयुक्त पाण्डय़े यांनी आयुक्तालयातर्फे प्रत्येक पेट्रोल पंपावर माहिती फलक लावून जनजागृती करण्यात येणार असल्याचे नमूद केले. पेट्रोल पंप व शहर पोलीस यांच्या संमतीने पंपावर हेल्मेटधारी दुचाकीस्वारांना पेट्रोल देण्यास प्राधान्य देण्यात येणार  असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार ५३ हेल्मेट उपलब्ध करण्यात आली आहेत.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंपावर पोलीस कर्मचारी नियुक्त केले जाणार होते. पहिल्या दिवशी जेलरोड, म्हसरूळ, पेठ रस्त्यावरील काही पंपांवर पोलीस नव्हते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सिडको, सातपूर परिसरातील पंपांवर दुपारी बारापर्यंत वेगळी स्थिती नव्हती. काही पंपांवर पोलिसांनी केवळ फेरफटका मारला. पूर्णवेळ पोलीस नसल्याने वाहनधारकांनी पंपावर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. हेल्मेट परिधान न केलेल्यांना पोलिसांनी दिलेला अर्ज भरून पेट्रोल दिले जाते. कारवाई होईल म्हणून अनेकांनी तो भरलाच नाही. अर्ज भरण्याची सक्ती आम्ही करू शकत नाही, असे पंपचालक, कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात आले. हेल्मेट नसणाऱ्यांना काही ठिकाणी पेट्रोल मिळाले नाही. त्यातील काही बाहेरून अन्य वाहनधारकांचे हेल्मेट तात्पुरत्या स्वरूपात घेऊन परतले. पंपाबाहेर घडणाऱ्या अशा बाबींवर आम्ही कसे लक्ष ठेवणार, असा प्रश्नही चालकांकडून उपस्थित केला जात आहे.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

पेट्रोल विक्रीवर परिणाम

पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेचा दैनंदिन पेट्रोल विक्रीवर परिणाम झाला आहे. मोहिमेच्या शुभारंभाचा दिवस सार्वजनिक सुट्टी अर्थात रविवारचा होता. त्यामुळे त्या दिवशी पेट्रोलची विक्री कमी असते. सोमवारी मात्र हेल्मेट नसणाऱ्या काहींनी पंपावर जाणे टाळले. दुपापर्यंत पेट्रोल विक्रीत २० टक्के घट झाल्याचे काही पंपचालकांकडून सांगण्यात आले. प्रत्येक पंपावर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचे आश्वासन यंत्रणेने दिले आहे. पोलीस उपस्थित असल्यास या मोहिमेची अंमलबजावणी होऊ शकते. वाहनधारक पंपावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालतात, अर्ज भरण्यास नकार देतात. अन्य वाहनधारकांकडून तात्पुरते हेल्मेट घेतात. यावर आम्ही कसे नियंत्रण ठेवणार, असा प्रश्न पंपचालक उपस्थित करीत आहेत.