पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये जोरधार

जिल्ह्यात मागील २४ तासात ९३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात ९३५ मिलीमीटर पाऊस; सात तालुक्यांत रिमझिम

नाशिक : जिल्ह्यात मागील २४ तासात ९३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदा प्रथमच एकाच दिवसात इतका पाऊस झाला असला तरी तो मुख्यत्वे पेठ, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये कोसळत आहे. नांदगाव, चांदवड, बागलाण, देवळा, येवला व सिन्नरमध्ये तो रिमझिम स्वरूपत आहे. दमदार पावसाने अद्याप संपूर्ण जिल्हा व्यापलेला नाही. संततधारेने शहरातील गटारींचे पाणी गोदापात्रात मिसळले. अनेक भागात झाडे कोसळली.

जून आणि जुलैच्या पूर्वार्धात जिल्ह्यत अधुनमधून पावसाने हजेरी लावली. तीन, चार तालुके वगळता इतरत्र दमदार स्वरुपात त्याचे अस्तित्व अधोरेखीत झाले नाही. गेल्या तीन-चार दिवसांपासून रिमझिम स्वरूपात राहिलेला पाऊस संततधार वळणावर पोहोचला. मात्र, काही विशिष्ट भागापुरताच तो मर्यादित राहिल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मागील २४ तासात सर्वाधिक पाऊस ३१५ मिलिमीटर पेठ तालुक्यात झाला. त्या खालोखाल इगतपुरी २४० तर त्र्यंबकेश्वरमध्ये २१६ मिलिमीटरची नोंद झाली. सुरगाण्यात ४५ मिलिमीटर पाऊस झाला. या भागात नद्या, नाले ओसंडून वाहू लागले असून धरणांत जलसाठा होण्यास सुरुवात झाली आहे. पेठ तालुक्यात पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने काही गावांचा संपर्क खंडित झाला. अन्यत्र पावसाचा तितका जोर नाही. दिंडोरी (२६), कळवण (२२), नाशिक (१९) आणि निफाड (१६) अशी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित सात तालुक्यांमध्ये तो रिमझिम स्वरुपात आहे. तिथे केवळ दोन ते १२ मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस पडला. यामध्ये चांदवड, बागलाण व नांदगाव (प्रत्येकी दोन मिलीमीटर), येवला (तीन), देवळा (४.१), सिन्नर (१०) आणि मालेगाव तालुक्यात (१२) मिलीमीटर पाऊस झाला.

हे वाचले का?  लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान

एक जून ते २२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात ५८०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत (५७३६) काहिसा अधिक आहे. तथापि, गेल्या वर्षी पावसाने सर्व तालुके व्यापले होते. कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र दमदार हजेरी लावली होती. यंदा मात्र तो काही भागापुरताच सीमित राहिला आहे. नाशिक तालुक्यात यंदा आतापर्यंत १४८ मिलिमीटर (गेल्या वर्षी ३२०), मालेगाव १९६ (३५४), नांदगाव १७० (२९८), चांदवड १२२ (१९८), बागलाण २०९ (४४८), सिन्नर १४३ (४३४), येवला ११३ (२८५), देवळा १७६ (३७६) अशी तफावत आहे.

हे वाचले का?  पैसे दामदुपटीच्या आमिषाने दोनशे कोटी रुपयांना फसवणूक, लासलगाव पोलिसांत गुन्हा

गोदाकाठावरील रहिवाशांना दरुगधीचा त्रास

संततधारेने बुधवारी रात्री शहरातील गटारे तुडुंब भरून वाहू लागली. त्याचे पाणी गोदावरी नदीत मिसळल्याने काठावरील भागात सर्वत्र दरुगधी पसरली होती. पात्रातील पाण्याचीही पातळी वाढली. रामकुंड परिसरात गटारीच्या पाण्यामुळे शनिचौकापर्यंत दरुगधी पसरल्याचे स्थानिक रहिवासी देवांग जानी यांनी सांगितले. या प्रकाराने संतप्त झालेले नागरिक दुपारी रामकुंड परिसरात एकत्र जमले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले. पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक नाल्यांमधून निचरा व्हायचा. सांडपाणी वाहणाऱ्या गटारींचे पाणी काही ठिकाणी थेट पात्रात मिसळते. रात्री तसाच प्रकार घडल्याची तक्रार नागरिकांनी केली. गटारीचे पाणी असेच पात्रात शिरल्यास आणि गंगापूरमधून विसर्ग झाल्यास काठावरील रहिवाश्यांना घराबाहेर पडता येणार नसल्याची बाब यावेळी मांडण्यात आल्याचे जानी यांनी सांगितले.

झाडांची पडझड

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

संततधारेत शहर परिसरात अनेक भागात झाडे कोसळली. नाशिकरोडच्या पौर्णिमा बस थांब्यामागील पिंपळाच्या झाडाला आग लागली. पथकाने धाव घेऊन ती विझवली. शास्त्रीनगर, पिंपळगाव खांब, कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनी, शास्त्रीनगर, गोविंदनगर या भागात झाडे कोसळली. काही झाडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीत अडथळे आले होते. जुन्या नाशिक भागातील कागदी वाडय़ाची भिंत पावसाने खचण्याची भीती व्यक्त झाली. अग्निशमनच्या पथकाने धाव घेत वाडय़ाच्या भिंतीलगतचा रस्ता लोखंडी जाळ्या लावून वाहतुकीसाठी बंद केला.