प्रत्यक्ष कर संकलन २२ टक्क्यांनी वाढून १०.६० लाख कोटींवर

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १८.२३ लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे, जे गेल्या आर्थिक वर्षात जमा १६.६१ लाख कोटी रुपयांपेक्षा ९.७५ टक्क्यांनी अधिक आहे.

देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत वार्षिक तुलनेत २२ टक्क्यांनी वाढून १०.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. जे संपूर्ण वर्षासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या ५८ टक्के आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी दिली.

हे वाचले का?  Vinesh Phogat : “…तर भारताने ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा”, विरोधकांची मागणी; पंतप्रधान काय म्हणाले?

यंदा वैयक्तिक प्राप्तिकर संकलन वाढल्याने एकूण कर महसूल वाढला असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले. कंपन्यांकडून यंदा कर संकलन १२.४८ टक्क्यांनी वाढले आहे, तर वैयक्तिक प्राप्तिकर संकलन ३१.७७ टक्क्यांनी विस्तारले आहे. स्थूल आधारावर, कंपनी आणि वैयक्तिक प्राप्तिकर समाविष्ट असलेल्या प्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या संकलनात १७.५९ टक्क्यांनी वाढ होऊन ते १२.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

प्रत्यक्ष कर संकलन, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा २१.८२ टक्के अधिक आहे. याचबरोबर मागील महिन्यात करदात्यांना सुमारे २७,००० कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला. १ एप्रिल ते ९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान एकूण १.७७ लाख कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा (टॅक्स रिफंड) देण्यात आला आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १८.२३ लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे, जे गेल्या आर्थिक वर्षात जमा १६.६१ लाख कोटी रुपयांपेक्षा ९.७५ टक्क्यांनी अधिक आहे.