बंडखोर आमदाराच्या मतदारसंघात शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्यांनी रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन केले.

मनमाड : शिवसेनेत बंड झाल्यानंतर सर्वात आधी एकनाथ शिंदे गटास जाऊन मिळणाऱ्यांमध्ये नांदगावचे बाहुबली आमदार सुहास कांदे यांचा समावेश होता. बंडखोर आमदार आणि मंत्र्यांच्या निषधार्थ नाशिक शहरात सेना पदाधिकाऱ्यांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. तथापि, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसैनिक अद्याप एकवटले नव्हते. ती कसर बुधवारी मनमाडच्या शिवसैनिकांनी भरून काढली. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्यांनी रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन केले.

सध्या राज्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. याद्वारे शिवसेना पक्षप्रमुखांना समर्थन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन त्यात बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात आला. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. हे दाखवून देण्यासाठी शहरातून भव्य समर्थन फेरी काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेनेच्या फेरीला पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यामुळे शिवसेनेतून नाराजीचे सूर उमटले. तसेच फेरीचे लावलेले फलकही पोलीस आणि पालिका प्रशासनाने काढून घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करून चौकातील चारही रस्त्यांवर लोखंडी जाळय़ा लावण्यात आल्या. मनमाडसह बाहेर गावाहून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.

हे वाचले का?  सप्तश्रृंग गड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल

या परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत शिवसैनिक मोठय़ा प्रमाणात चौकात दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.  या वेळी माजी आमदार राजाभाऊ देशमुख, ज्येष्ठ नेते अल्ताफ खान, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, हरीश आसर, अशोक पदमर, माजी नगराध्यक्ष व गटनेते गणेश धात्रक, सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली

दरम्यान, बंडखोर सेना मंत्री वा आमदारांच्या मतदारसंघात आजपर्यंत शिवसैनिक एकत्रित आले नव्हते. माजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात बंडखोरीला कोणीही विरोध केल्याचे दिसले नाही. तशी स्थिती आमदार सुहास कांदे यांच्या नांदगावमध्ये मतदारसंघात होती. परंतु, हळूहळू आता निष्ठावान शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत.

हे वाचले का?  भुसावळ – सुरत रेल्वेसेवा विस्कळीत, चिंचपाडा स्थानकात रेल्वे रुळावर मातीचा भराव, मालवाहू गाडी रुतली