बदलणाऱ्या निसर्गामुळे आत्मपरीक्षणाची गरज

संस्था निर्माण करण्याबरोबरच त्या दर्जेदारपणे चालाव्यात, दीर्घकाळ उपयोगात याव्यात, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

नाशिक : दिवसेंदिवस निसर्गाची बदलणारी रूपे, त्यातून एकापाठोपाठ येणाऱ्या चक्रीवादळांनी मानवाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडले आहे. त्याची प्रचीती आपल्या सर्वाना नुकतीच मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात आली आहे. या सर्वाची कारणमीमांसा करण्याची गरज असून विकासाच्या हव्यासापोटी आपण काही चुकीचे तर करत नाही ना, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था ‘मित्रा’च्या इमारतीचे आणि मुख्य अभियंता कार्यालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. विकास आणि पर्यावरण हे जणू एकमेकांचे परस्परविरोधी शब्द असल्यासारखे वातावरण अलीकडे सर्वत्र निर्माण झाले असताना ‘मित्रा’ विकास आणि पर्यावरण यांच्यातील सांधा म्हणून काम करेल. पाण्याचे चांगले प्रकल्प उभारणे जसे गरजेचे आहे तसेच त्या प्रकल्पाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण पाणी घराघरात नळाद्वारे पोहोचविण्याचे व्यवस्थापन कौशल्यही आजची नितांत गरज असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.  संस्था निर्माण करण्याबरोबरच त्या दर्जेदारपणे चालाव्यात, दीर्घकाळ उपयोगात याव्यात, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. राज्याची तहान भागविणारे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. शहर नियोजनात स्वच्छ पाण्याबरोबर त्याची गुणवत्ता राखण्याचीही काळजी घेतली जाणे अपेक्षित असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या संस्थेमुळे जिल्ह्य़ातील असंख्य ठिकाणांचा अभ्यास तसेच पर्यटन करता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले तर कृषिमंत्री दादा भुसे यांनी हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचेही भाषण झाले. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य प्रधान सचिव आशीषकुमार सिंह, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य प्रधान सचिव सुजाता सौनिक हेही उपस्थित होते.

हे वाचले का?  देवळालीत सरावावेळी तोफगोळ्याचा स्फोट, दोन अग्निविरांचा मृत्यू