करोनाचा फटका वेगवेगळय़ा क्षेत्रांना बसला असतांना शिक्षण क्षेत्रही त्यास अपवाद राहिलेले नाही.
नाशिक : करोनाचा फटका वेगवेगळय़ा क्षेत्रांना बसला असतांना शिक्षण क्षेत्रही त्यास अपवाद राहिलेले नाही. येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम परीक्षेचे वेळापत्रक करोना संसर्गामुळे बदलले असल्याने भावी मुख्याध्यापकांसमोर नव्या शैक्षणिक वर्षांत सुट्टी कशी मिळवायची, असा प्रश्न पडला आहे. दुसरीकडे या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना नाहक झळ सोसावी लागणार आहे.
दोन वर्षांपासून करोना संसर्गामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाल्याने वेगवेगळे क्षेत्र बाधित झाले. शिक्षण क्षेत्रातही हा विस्कळीतपणा आला. शिक्षण खंडित होऊ नये यासाठी आभासी शिक्षणाचा पर्याय स्वीकारला गेला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सुरुवातीपासून दूरस्थ शिक्षणावर भर देत असताना या काळात मात्र प्रवेश प्रक्रियेसह साऱ्या प्रक्रिया खोळंबल्या. मुख्याध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या शालेय व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना या अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. शासनाच्या निकषानुसार सहा महिने शिक्षक म्हणून काम केल्यानंतर मुख्याध्यापक पदासाठी शालेय व्यवस्थापनाचा अनुभव असावा, यासाठी शालेय व्यवस्थापन पदविका परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे.
जिल्हा परिसरातून या परीक्षेत दोन हजारांहून अधिक शिक्षक मुख्याध्यापक पदासाठी आपले नशीब आजमावणार आहेत. करोनामुळे प्रवेश उशिराने झाल्याने वर्ग उशीराने सुरू झाले. एरवी हा सर्व अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षांत पूर्ण करुन उन्हाळी सुट्टीत परीक्षा घेतल्या जात होत्या. यंदा करोनामुळे ही प्रक्रिया रखडली. आता २२ जूनपासून १७ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील दोनपेक्षा अधिक केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत संबंधित भावी मुख्याध्यापकांच्या हातात परीक्षेचे वेळापत्रक पडल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
शासनाच्या आदेशानुसार नव्या शैक्षणिक वर्षांचा आरंभ झाला असला तरी १५ जूनपासून शाळा प्रत्यक्ष सुरू होत आहे. शाळा सुरू होत असतांना विद्यार्थ्यांचे मन शाळेत रमावे यासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात. मोफत पुस्तक वितरण, शासकीय योजनेस पात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करणे यासह अन्य कामे असतांना २२ जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी शाळास्तरावर सुट्टी मिळेल का, असा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात उपस्थित होत आहे.
याविषयी परीक्षार्थी संजय चव्हाण यांनी माहिती दिली. नेहमी या परीक्षा उन्हाळी सुट्टीत होतात. तसेच वर्ग शनिवारी आणि रविवारी होतात. त्यामुळे प्रत्येक शाळेतून चार ते पाच शिक्षक परीक्षेस बसतात. यंदा मात्र परीक्षा २२ जूनपासून सुरू होत आहे. सात ते आठ दिवसांहून अधिक रजा, एका शाळेतून चारहून अधिक शिक्षक असतील तर सुट्टी मिळेल का, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. या परीक्षा विद्यापीठाने आभासी पध्दतीने किंवा शनिवारी, रविवारी घ्याव्यात, अशी सूचना त्यांनी केली आहे.
परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच
मुक्त विद्यापीठाच्या सर्व परीक्षा वेळापत्रकानुसार होत आहे.शालेय व्यवस्थापन त्यास अपवाद ठरणार नाही. करोना आपत्कालीन परिस्थितीमुळे वेळापत्रक बदलले आहे. या वर्षांपुरता ही अडचण आहे. हे वेळापत्रक बदलले तर पुढील विद्यार्थ्यांना याच अडचणीना तोंड द्यावे लागेल. शिक्षकांची अडचण होत असली तरी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील. – भटुप्रसाद पाटील (परीक्षा नियंत्रक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ)
चारुशीला कुलकर्णी